गोव्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याचा गोवा शासनाचा दावा; मात्र गोमेकॉतील रुग्ण ऑक्सिजनअभावी अत्यवस्थ !

याविषयी शासनाने जनतेला योग्य माहिती देणे आवश्यक !

पणजी, १० मे (वार्ता.) – राज्यशासनाच्या वतीने राज्यात ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा वारंवार केला जात असला, तरी वैद्यकीय सेवेसाठी राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उलट स्थिती आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रतिदिन पहाटे ३ वाजता ऑक्सिजनचा तीव्र तुटवडा भासत आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना रात्री मरणासन्न अवस्थेला सामोरे जावे लागत असल्याची स्थिती आहे.

प्राप्त माहितीनुसार गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने ऑक्सिजनची नवीन ट्रॉली उपलब्ध होईपर्यंत ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना सहकार्य करणार्‍या कार्यकर्त्या सुप्रिया म्हणाल्या, ‘‘पहाटे ३ वाजता वॉर्ड क्रमांक ११३ आणि वॉर्ड क्रमांक १४५ मधील ऑक्सिजनची तीव्रतेने कमतरता भासते. रुग्ण ऑक्सिजन मिळण्यासाठी धडपडत असतात, तर त्यांचे कुटुंबीय याविषयी तक्रार करण्यासमवेतच कार्यकर्त्यांना संदेश पाठवून आणि सामाजिक माध्यमातून आवाहन करून ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकणार का ? यासाठी जिवाचे रान करत असतात. वॉर्डमध्ये ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्ण दगावत आहेत.’’

वॉर्ड क्रमांक १४५ मध्ये उपचार चालू असलेल्या एका महिलेचा मुलगा म्हणाला,‘‘माझ्या आईला न्युमोनिया पूर्ण फुप्फुसात पसरला असून तिची स्थिती अत्यवस्थ आहे. ९ मेच्या रात्री ऑक्सिजनचा दाब ०.५ पी.एस्.आय्. पेक्षाही अल्प होता आणि ही स्थिती तब्बल १० मिनिटे होती. असे २ वेळा घडले.’’

वॉर्ड ११३ मध्ये उपचार घेणार्‍या एका महिलेचा मुलगा म्हणाला, ‘‘माझी ४५ वर्षीय आई मागील ३ दिवस व्हेंटिलेटरसाठी धडपडत आहे; मात्र अजूनही तिला तो मिळू शकलेला नाही. तिला आता ऑक्सिजनवरच दिवस काढावे लागत आहेत.’’

महाविद्यालयातील काही वॉर्डमध्ये ऑक्सिजन कन्स्ट्रेटर्स विनावापर पडून

रुग्णालयातील एक परिचारिका म्हणाली, ‘‘गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील काही वॉर्डमध्ये ऑक्सिजन कन्स्ट्रेटर्स विनावापर पडून आहेत. ११० व्होल्टच्या आणि ‘फ्लॅट पिन’ असलेल्या ऑक्सिजन कन्स्ट्रेटर्सच्या वापराविषयी कर्मचार्‍यांना माहिती देण्यात आलेली नाही.’

ऑक्सिजनचा तीव्र तुटवडा आणि खाटांची कमतरता यांविषयी एका मासापासून डॉक्टर करत आहेत तक्रार

राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३१ सहस्रांहून अधिक झाला आहे. प्रतिदिन अडीच सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित नवीन रुग्ण सापडत आहेत, तसेच रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्ण भरती होत आहेत. महाविद्यालयातील डॉक्टर एका मासापासून (महिन्यापासून) ऑक्सिजनचा तीव्र तुटवडा आणि खाटांची कमतरता यांविषयी व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रार करत आहेत; मात्र वारंवार सरकार स्थिती नियंत्रणात आहे आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुधारला असल्याचा दावा करत आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जागेअभावी आता रुग्णांना भूमीवर एखाद्या कागदी पुठ्ठ्यावर किंवा चादरीवर झोपवून उपचार केले जात आहेत.