सर्व प्रकारचे कौटुंबिक दायित्व व्यवस्थित पार पाडणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा ठेवून शेवटच्या क्षणापर्यंत नामजप करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले पुणे येथील कै. मोहन शंकर चतुर्भुज (वय ६७ वर्षे) ! 

३०.४.२०२१ या दिवशी मोहन शंकर चतुर्भुज यांचे पुणे येथे निधन झाले. ११.५.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. पुणे येथे रहाणारी त्यांची कन्या आणि पत्नी यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. मोहन चतुर्भुज

१. कु. मधुरा चतुर्भुज (कन्या)

कु. मधुरा चतुर्भुज

१ अ. बालपण : ‘बाबा ५ वर्षांचे असल्यापासून त्यांच्या आजोबांकडे रहात होते. त्यांचे शालेय शिक्षण तावशी, बारामती आणि पुणे येथे झाले. बालपणी त्यांनी सर्वांच्या घरी कष्टाची कामे केली. लहानपणापासून बाबा गणपति आणि विठ्ठल यांची उपासना करायचे.

१ आ. शिक्षण : त्यांनी शिक्षण करत करत नोकरी केली. आरंभी त्यांनी शिक्षकाची नोकरी केली आणि अधिकोषाच्या (बँकेच्या) परीक्षा दिल्या. त्यांना वेळोवेळी पुरस्कार आणि पदोन्नतीही मिळत गेली. शेतीची माहिती असल्याने त्यांनी शेतकर्‍यांना साहाय्य केले. त्यामुळे त्यांना बाबांचा आधार वाटायचा.

१ इ. कुटुंबाचे दायित्व व्यवस्थित पार पाडणे

१ इ १. भावंडांची शिक्षणे आणि विवाह करून देणे : बाबा घरात मोठे असल्याने त्यांच्यावर पूर्ण कुटुंबाचे दायित्व होते. त्यांनी सर्व भावंडांची शिक्षणे आणि लग्नेही दायित्व घेऊन पार पाडली. बाबांच्या लग्नानंतर आईने त्यांना पुष्कळ साथ दिली. बाबांनी कुटुंबासाठी सर्वकाही आनंदाने केले.

१ इ २. आई-वडिलांची सेवा करणे : बाबांनी त्यांच्या आई-वडिलांनाही प्रेमाने सांभाळले. आजोबांच्या शेवटच्या काळात त्यांनी त्यांची पुष्कळ सेवा केली. ते आजीला नेहमी नामजप करायला सांगायचे.

१ इ ३. पत्नीला साहाय्य करणे : बाबा आईला प्रत्येक गोष्टीत साहाय्य करत होते. त्यांना उत्तम स्वयंपाक करता यायचा.

१ इ ४. साधिकेचा आध्यात्मिक त्रास न्यून व्हावा, यासाठी प्रयत्न करणे : लहानपणी मला पूर्वजांचा तीव्र त्रास होता. तेव्हा बाबा मला दत्ताच्या नामजपाची आठवण करून द्यायचे आणि ‘सतत नामात रहायचे’, असे सांगायचे. पूर्वजांचे त्रास न्यून होण्यासाठीचे विधी आणि इतर विधी त्यांनी पूर्ण केले. मला त्रास होत असतांना त्यांनी मला पुष्कळ सांभाळले. नंतर माझा त्रास वाढल्यामुळे वर्ष २००६ मध्ये बाबांनी नोकरी सोडली आणि ते पूर्णवेळ साधना करू लागले.

१ इ ५. गुरुकृपेने भावाचे शिक्षण सरकारी महाविद्यालयात अल्प व्ययात होणे : माझ्या दादाचे अभियांत्रिकीचे आणि ‘एम.बी.ए.’चे शिक्षण सरकारी महाविद्यालयात झाले. त्यामुळे अल्प व्यय आला. ही गुरुकृपाच होती. बाबांनी दादाला शिक्षणासाठी नेहमी साहाय्य केले.

१ ई. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला आरंभ ! : पंढरपूर येथे त्यांचा सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेचा प्रवास चालू झाला. नंतर त्यांना भावाच्या स्तरावर अनेक अनुभूती आल्या. बाबांचा व्यष्टी साधनेचा भाग पुष्कळ चांगला होता. ते स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् भावजागृती यांसाठी पुष्कळ चांगले प्रयत्न करायचे. ते चिकाटीने नामजपही पूर्ण करायचे. त्यांना ग्रंथ वाचनाची पुष्कळ आवड होती. बाबांना आध्यात्मिक ज्ञानही मिळत होते. नोकरीमुळे त्यांचे बर्‍याच ठिकाणी स्थलांतर होत होते; पण न कंटाळता तेथेही त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आणि सत्संग चालू केले. ते प्रत्येक सेवा परिपूर्ण करण्याचा तळमळीने प्रयत्न करायचे.

१ उ. अनेक वेळा अपघातातून वाचणे : बाबांचे अनेक वेळा अपघात झाले; पण प्रत्येक वेळी ते श्री गुरूंच्या कृपेमुळे वाचले. गाडी चालवतांना नेहमी त्यांचा नामजप चालू असायचा.

१ ऊ. परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेले कौतुक ! : पूर्वी बाबांची परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली आहे. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणायचे, ‘‘तू तुझ्या बाबांच्या सारखा नामजप कर.’’ ते बाबांच्या सेवेचेही कौतुक करायचे आणि बाबांना नेहमी सांगायचे, ‘‘तुम्ही मधुराची काळजी करू नका.’’

१ ए. कोरोना झाल्यावर स्थिर असणे : बाबांना कोरोना झाल्यावर ते स्थिर होते. त्यांनी ‘माझी काळजी करू नका’, असा आम्हाला निरोप दिला. या त्रासातही बाबांचा नामजप शेवटपर्यंत चालू होता.

१ ऐ. साधकांकडून लाभलेले साहाय्य : सौ. मनीषाताईंनी (सौ. मनीषा पाठक यांनी) बाबांना पुष्कळ साहाय्य केले. पुण्यातील पाटील कुटुंबानेही आम्हाला पुष्कळ साहाय्य केले.

१ ओ. भाऊ आणि वहिनी यांनी वडिलांची सेवा मनापासून करणे : बाबांनी माझ्या वहिनीला मुलीप्रमाणे प्रेम दिले आणि तीही त्यांना कधीही उलट बोलली नाही. बाबांच्या मृत्यूपूर्वी भावाने १५ दिवस वडिलांची सेवा न कंटाळता मनापासून केली. बाबांच्या मृत्यूनंतरही तो स्थिर होता.

बाबांच्या मृत्यूनंतरचे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि पू. अशोक पात्रीकरकाका या सर्वांनी आम्हाला धीर दिला.

१ औ. पूर्वसूचना मिळणे : ‘बाबांविषयी काहीतरी अशुभ घडणार आहे’, याची पूर्वसूचना मिळून मी अस्वस्थ झाले होते. त्यानंतर बाबा गेल्याचे कळले. त्या वेळी देवाने मला स्थिर ठेवले. त्या वेळी आईचे रक्षायंत्र गळून पडले. ‘आईही लवकरच स्थिर झाली’, ही गुरुकृपा !

२. श्रीमती माधवी चतुर्भुज (पत्नी)

श्रीमती माधवी चतुर्भुज

२ अ. यजमानांना कोरोनाची लागण झाल्यावर सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात गुरुकृपेने जागा मिळणे; मात्र त्यांचा त्रास वाढत गेल्यामुळे त्यांना अतीदक्षता विभागात भरती करावे लागणे : ‘यजमानांना कोरोनाची लागण झाल्यावर रुग्णालयात भरती केले. तेव्हा गुरुकृपेने एक जागा मिळाली. त्या रुग्णालयात इतरही सुविधा उपलब्ध होत्या आणि तेथील आधुनिक वैद्यही ओळखीचे होते. त्यांनी पुष्कळ प्रेमाने सर्व प्रयत्न केले. या काळात आमचा मुलगा मंगेश आणि सून राखी यांनी यजमानांची सेवा पुष्कळच आनंदाने केली आणि सर्व प्रयत्न केले. पहिल्या ८ दिवसांत यजमानांना कमी-अधिक प्रमाणात त्रास होत होते. ८ दिवसांनंतर मात्र त्यांच्या त्रासांत वाढ होऊन त्यांना अतीदक्षता विभागात भरती करावे लागले. त्यांना ‘व्हेंटिलेटर’ लावला होता.

२ आ. सेवेची तळमळ : यजमान त्यांना सांगितलेले नामजपादी उपाय चिकाटीने अन् एकाग्रतेने करत होते. त्यांच्या मनात सतत सेवेचे विचार असायचे. ‘आपली सेवा कशी परिपूर्ण होईल ?’, असा त्यांना ध्यास असायचा. ते गोवा येथे आले असतांना मला म्हणाले होते, ‘‘मला पुण्याला जाऊन माझी सेवा पूर्ण करायची आहे.’’ त्यांच्यात सेवेची पुष्कळ तळमळ होती. ते नेहमी गुरुसेवेला प्राधान्य द्यायचे. त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रेमभाव होता.

२ इ. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेला भाव : त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्कळ श्रद्धा होती आणि त्यांच्याप्रती सतत कृतज्ञताही वाटत होती. ‘सर्व काही गुरुदेवच करत आहेत. आपल्या सर्वांसमवेत गुरुदेव सतत आहेत’, असे ते म्हणायचे. रुग्णालयात असतांना ते ‘माझ्यासह गुरुमाऊली आहे. काळजी करू नको’, असे म्हणायचे. शेवटच्या १५ दिवसांत गुरुकृपेने त्यांनी नामजपादी साधना पुष्कळ केली.

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक