‘जिणे गंगौघाचे पाणी’, म्हणजे गंगेच्या प्रवाहाच्या पाण्याप्रमाणे निर्मळ आणि पवित्र असे व्यक्तीमत्त्व असलेले पू. (कै.) प्रा. रत्नाकर रामचंद्र मराठे !

‘१६.४.२०२५ (चैत्र कृष्ण तृतीया) या दिवशी सनातनचे १५ वेत संत पू. (कै.) प्रा. रत्नाकर मराठे यांची १३ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांचे अमरावती येथील भाऊ प्रा. संजय रामचंद्र मराठे (वय ७१ वर्षे) यांना जाणवलेली पू. (कै.) प्रा. रत्नाकर मराठे यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. (कै.) प्रा. रत्नाकर मराठे

पू. (कै.) प्रा. रत्नाकर मराठे यांच्या १३ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार ! 

१. दुर्मिळ व्यक्तींपैकी एक पू. (कै.) रत्नाकर मराठे !

‘अध्यात्म, संगीत आणि भक्ती या अजोड संगमावरील मानवी शिल्पे काही निवडक व्यक्तींच्या रूपात आपल्या सभोवती वावरत असतात. याची जाणीव होऊन त्यांच्या परिस स्पर्शाने पुनीत होण्याचे भाग्य मला या जन्मी लाभले. अशा दुर्मिळ व्यक्तींपैकी एक, म्हणजे पू. (कै.) रत्नाकर मराठे !

२. पू. (कै.) रत्नाकर मराठे आणि त्यांचा भाऊ श्री. संजय रामचंद्र मराठे यांच्यातील साम्य अन् भेद

मी रत्नाकरचा पाठचा भाऊ; मात्र बौद्धिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या क्षेत्रांतील उन्नतीच्या संदर्भात आम्हा दोघांत साम्यापेक्षा भेद अधिक.

अ. आम्ही दोघेही प्राध्यापक. ‘बरेचसे ‘कॉमन’ मित्र आणि पारिवारिक अन् कौटुंबिक संस्कार’ ही आमच्यातील काही साम्य स्थळे.

आ. मी सर्वसामान्य बुद्धीचा, तर रत्नाकर असामान्य बुद्धीमत्ता असलेला.

इ. खरा भेद, म्हणजे रत्नाकरचे जीवन जगणे, म्हणजे ‘जिणे गंगौघाचे पाणी’ ! पवित्र, शीतल आणि निर्मळ गंगौघ ! जीवनात कितीही रंग आले, तरीही यांचे पावित्र्य जसेच्या तसे आणि मी ? ‘पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो वैसा ।’ असो. आता तुलनेला पूर्णविराम.

३. नास्तिकतेकडून आस्तिककडे प्रवास होऊन पू. रत्नाकर मराठे त्यांच्या आराध्याशी एकरूप होणे

लौकिक अर्थाने अध्यात्म, देव देव करणे, मंदिरात जाणे, यांपासून रत्नाकर तसा सहसा दूरच असे. पू. रत्नाकरचे जीवन, म्हणजे थोड्याशा नास्तिकतेकडून आस्तिककडे आणि तेथून थेट आध्यात्मिक वाटेने निर्गुण अन् निरपेक्ष होत होत पूर्णपणे त्याच्या आराध्याशी एकरूप होण्याचा प्रवास. या प्रवासात त्याची संगत श्रीकृष्णाशी ! तसाही आम्हा ५ भावांत रत्नाकर अर्जुनाप्रमाणे मधला, म्हणजे तसाही कृष्णसखाच !

४. पू. (कै.) रत्नाकर मराठे यांचे जिणे गंगौघाचे पाणी !

याचे दाखले त्याच्या भौतिक जीवनातही पदोपदी आढळून येत होते. त्याच्या जीवनपटाचे सिंहावलोकन करतांना पदोपदी त्याच्या स्थितप्रज्ञतेची जाणीव होते.

श्री. संजय मराठे

४ अ. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गणित शिकवण्याची हातोटी ! : अमरावतीच्या शासकीय ‘विदर्भ महाविद्यालया’तून गणितात पारंगत पदवी प्राप्त केल्यानंतर लगेचच वर्षभराच्या आतच त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू होण्याचा सन्मान त्याला लाभला. प्रत्येक गणित पायरी पायरीने (स्टेप बाय स्टेप) समजावून सांगण्याच्या त्याच्या हातोटीमुळे तो विद्यार्र्थ्यांमध्येही लोकप्रिय झाला; मात्र अंतिम उत्तर योग्य; पण मधल्या पायर्‍या (स्टेप्स) गाळून किंवा त्यावरून उड्या मारत परीक्षेत अंतिम उत्तर योग्य लिहिले, तरीही रत्नाकर त्या विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण देत नसे. रत्नाकरचा कटाक्ष असे की, उत्तर कसे काढले किंवा आले, ते सिद्ध करणार्‍या मधल्या ज्या पायर्‍या आवश्यक आहेत, त्या लिहायलाच हव्यात.

४ आ. रत्नाकर जसा विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होता, तसाच तो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्येही लोकप्रिय होता. 

४ इ. विविध क्षेत्रांमध्ये दायित्व घेणे 

१. त्याच्याकडे अनेक वर्षे महाविद्यालयात विद्यापीठ परीक्षा सफलतापूर्वक सुनियोजित करण्याचे दायित्व होते.

२. तो महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर काही वर्षांतच एम्.एस्सी. (गणित) च्या वर्गाच्या अध्यापनाचे दायित्वही त्याला देण्यात आले.

३. बुद्धीबळ आणि हॉकी या २ खेळांच्या महाविद्यालयीन अन् आंतर विद्यापीठ स्पर्धा यांत त्याने महाविद्यालय आणि अमरावती विद्यापीठ यांच्या संघासाठी ‘मॅनेजर’ (व्यवस्थापक) म्हणूनही उत्तम काम केले.

४. रत्नाकर उत्तम बुद्धीबळपटू होता. तो विदर्भातील पहिला बुद्धीबळ नॅशनल आर्बिटर (सरपंच) होता. त्याने प्रयत्न करून आणि आवश्यक धनराशी भरून अमरावती विद्यापिठाच्या बुद्धीबळ ‘चॅम्पियन’ संघासाठी आमच्या वडिलांच्या नावाने ‘रामचंद्र वामन मराठे बुद्धीबळ करंडक’ चालू केला आहे.

५. रत्नाकरचा मित्र परिवारही पुष्कळ मोठा होता. त्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहलीप्रमाणे आपल्या मित्रांसाठीही विविध सहलींचे आयोजन, नियोजन आणि यशस्वी व्यवस्थापन केले.

६. घरातील कौटुंबिक सोहळे, लग्न, मुंजी, धार्मिक सण आणि कुलाचार यांच्या आयोजनात रत्नाकर तन, मन आणि धन पूर्णपणे अर्पून सहभागी होत असे. येथे सहभागी होत असे, म्हणणे फारच तोकडे आहे. ‘त्यासाठी तो स्वतःला वाहून घेत असे’, असे म्हणणे सयुक्तिक आहे.

५. सनातन संस्थेशी संपर्क 

५ अ. साधकाची प्रवचने ऐकून सनातन संस्थेविषयी औत्सुक्य जागे होणे : वर्ष १९९४ – १९९५ मध्ये सनातनचे साधक आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे अमरावती येथे संस्थेच्या प्रचारार्थ आणि शक्यतो अमरावती येथे ही संस्था रुजवण्यासाठी आले. रत्नाकरने त्यांची २ – ३ प्रवचने (सत्संग) ऐकली. रत्नाकरने त्यांना व्याख्यानासाठी ३ – ४ ठिकाणी स्वतःच्या दुचाकीवरून पोचवले. आडनावबंधू आणि जातीबांधव असल्याने आमचेही आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे आणि सनातन यांच्याविषयी औत्सुक्य जागे झाले; मात्र रत्नाकरइतके नक्कीच नाही.

६. पू. (कै.) रत्नाकर यांच्या जीवनाला कलाटणी देणारा क्षण (‘टर्निंग पॉईंट’)

अमरावती येथील कामे आटोपल्यावर थोडीफार कामे रत्नाकर आणि अमरावती येथे परिचय झालेल्या अन्य व्यक्ती यांच्यावर सोपवून आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे पुढील कार्यासाठी दुसर्‍या गावाला गेले. येथे रत्नाकरच्या जीवनात ‘टर्निंग पॉइंट’ आला. आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांचा प्रभाव म्हणण्यापेक्षा त्यांचा ३ – ४ दिवसांचा सहवास, हीच ती वेळ, जिने रत्नाकरची जीवनधारा गंगौघामध्ये पालटली. क्षण किंवा निमित्त जरी हे असले, तरी हेच त्याचे पूर्वसंचित किंवा प्राक्तन !

७. स्थितप्रज्ञ राहून स्वतःची बाजू मांडणे आणि स्वतःच्या विहित कार्याला प्राधान्य देणे

सनातनच्या कार्यात साधक म्हणून सहभागी झाल्यावर संस्थेच्या निकषांनुसार त्याची साधनेची पातळी उत्तरोत्तर वाढत गेली आणि त्याची वाटचाल गंगौघाप्रमाणे स्थितप्रज्ञतेकडे होऊ लागली.

अ. त्याला कुटुंबात होणार्‍या सर्वच गोष्टी पटत असोत वा नसोत, तो स्थितप्रज्ञतेने स्वतःची बाजू, म्हणजे सत्य सांगत असे.

आ. त्याने सनातनच्या कार्यात वाहून घेणे, हे घरातील सर्वांना पटलेच होते, असे नाही. विशेषत: ‘संस्थेच्या कार्यात पूर्ण वेळ देता यावा’, यासाठी ८ वर्षे आधीच नोकरी सोडून सेवानिवृत्ती घेणे, हे घरातील व्यक्ती आणि मित्र यांना पटलेले नव्हते. रत्नाकरने त्याची बाजू वादविवाद टाळून सर्वांना सांगितली आणि स्थितप्रज्ञतेने आपल्या विहित कार्याला प्राधान्य देऊन सेवानिवृत्ती घेतली.

८. संतपद गाठणे

अध्यात्माच्या उन्नत पातळीवर पोचत तो सनातन संस्थेच्या पातळींच्या निकषांनुसार संत पातळी गाठून संत झाला. २०१२ या वर्षी त्याच्या देहत्यागानंतर त्याचे संतपद घोषित झाले.

९. श्रीमती मनीषा मराठे (पू. रत्नाकर मराठे यांच्या पत्नी, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६९ वर्षे) तन, मन आणि धन अर्पून साधना करत असणे

आमच्या मनीषावहिनीही (पू. रत्नाकर यांच्या पत्नी, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६९ वर्षे) सनातनच्या कार्यात रस आणि रुची घेऊ लागल्या, तशी त्यांचीही वाटचाल स्थितप्रज्ञतेकडे होत राहिली. आता त्यांनीही सनातन संस्थेच्या कार्यात पुष्कळ वरची पातळी गाठली आहे. रत्नाकरच्या पश्चात आता त्यांनीही सनातनच्या कार्यात तन, मन आणि धन अर्पण केले आहे.

मला रत्नाकरचा पाठचा भाऊ होण्याचे भाग्य लाभले, यासारखा दुसरा पुरस्कार माझ्यासाठी नाही.

रत्नाकरला त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने माझी विनम्र श्रद्धांजली !

– श्री. संजय रामचंद्र मराठे (पू. (कै.) रत्नाकर मराठे यांचे लहान भाऊ, वय ७१ वर्षे), अमरावती (७.४.२०२५)