‘मला ‘स्लिप डिस्क’चा (मणक्यातील गादी सरकल्याने चालतांना एक पाय पुष्कळ दुखणे.) पुष्कळ त्रास होत होता. आधुनिक वैद्यांनी मला शस्त्रकर्म करायला सांगितले होते. ३०.९.२०२४ या दिवशी मडगाव येथील ‘व्हिक्टर’ रुग्णालयात माझे मणक्याचे शस्त्रकर्म झाले. त्या कालावधीत मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सुकोमल चरणी अर्पण करते.

१. शस्त्रकर्म करून घेण्यासाठी रुग्णालयात भरती होणे
१ अ. नेहमी अल्प असलेले रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण शस्त्रकर्माच्या वेळी वाढणे आणि गुरुकृपेने रक्त द्यावे न लागणे : माझ्या रक्तातील ‘हिमोग्लोबिनचे प्रमाण’ ७.३० किंवा ८ ग्रॅम प्रति डेसीलिटर असे असायचे. (सर्वसाधारण स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन १२.१ ते १५.१ ग्रॅम प्रति डेसीलिटर असे असते.) मी शस्त्रकर्म करण्यासाठी रुग्णालयात भरती झाले. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी माझ्या काही तपासण्या केल्या. तेव्हा विशेष म्हणजे नेहमी अल्प असणारे माझ्या रक्तातील ‘हिमोग्लोबिनचे’ प्रमाण शस्त्रकर्माच्या आदल्या दिवशी वाढले (९ ग्रॅम प्रति डेसीलिटर झाले) होते. त्यामुळे गुरुकृपेने मला रक्त द्यावे लागले नाही.

१ आ. शस्त्रकर्माच्या दिवशी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले समवेत आहेत’, असा भाव ठेवल्यामुळे भीती न्यून होणे : ३०.९.२०२४ या दिवशी सकाळी ७.३५ वाजता मला शस्त्रकर्मगृहात नेले. मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘प.पू. गुरुमाऊली, तुम्हीच माझे शस्त्रकर्म करणार आहात.’ त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी श्रीविष्णूची मूर्ती आहे आणि माझ्या सर्व चक्रांवर कमळ आहे.’ मी ‘प.पू. गुरुमाऊलीच माझे शस्त्रकर्म करणार आहेत’, असा भाव ठेवल्यामुळे माझी भीती उणावली.
१ इ. मी रुग्णालयात असतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला ‘महाशून्य’ हा नामजप सतत करत होते.
१ ई. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाणीतील भक्तीसत्संग ऐकल्यावर सकारात्मक राहून भावाच्या स्तरावर प्रयत्न करता येणे : मी ५ दिवस रुग्णालयात होते. तेव्हा मी भ्रमणभाषवर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाणीतील ‘रक्षाबंधनाच्या निमित्ताने झालेला ‘श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील भक्तीमय नाते उलगडणारा’ भक्तीसत्संग ऐकत होते. द्रौपदीच्या जीवनात आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगाच्या वेळी ती श्रीकृष्णाला आर्ततेने हाक मारत होती. मला होणार्या त्रासावर मात करण्यासाठी मीही द्रौपदीप्रमाणे आर्ततेने प्रार्थना करण्याचा प्रयत्न करत होते. मी ‘गुरुदेव, मला त्रास सहन करता येऊ दे आणि मला आपल्या अनुसंधानात रहाता येऊ दे’, अशी प्रार्थना करत असल्यामुळे माझ्या मनाची स्थिती चांगली होती आणि देवाच्या कृपेने मला त्रास सहन करता आला.
२. गुरुदेवांच्या कृपेने सकारात्मक रहाता येणे
मी रुग्णालयात असतांना आणि आश्रमात आल्यावर माझे नातेवाईक किंवा साधक मला भेटायला आल्यावर सांगत, ‘‘तुमच्याकडे पाहून तुमचे नुकतेच शस्त्रकर्म झाले आहे’, असे वाटत नाही. तुमचा चेहरा आनंदी दिसत आहे. तुमच्याकडे पाहून चांगले वाटते.’’ तेव्हा गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला वाटत असे, ‘माझ्या शरिराला रोग झाला आहे; पण मनाला झाला नाही.’ त्यामुळे मी सतत आनंदी आणि सकारात्मक रहात असे.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा लाभलेला चैतन्यदायी सत्संग
३ अ. साधिकेच्या पायात होणार्या वेदना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तिच्या डाव्या मांडीवर हात फिरवल्यावर नाहीशा होणे : माझे शस्त्रकर्म झाल्यानंतर अनुमाने १ मासाने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी त्या मला भेटण्यासाठी माझ्या खोलीत आल्या. त्यांनी मला त्यांच्या जवळ बसायला सांगितले. त्या मला भेटायला येण्यापूर्वी माझा डावा पाय पुष्कळ दुखत होता. मी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या जवळ बसल्यावर त्या बोलता बोलता माझ्या डाव्या मांडीवर हात फिरवत होत्या. त्या खोलीतून गेल्यानंतर ‘माझ्या पायाच्या वेदना पूर्णपणे थांबल्या आहेत’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा ‘गुरूंचे अस्तित्व आणि चैतन्य’ यांमुळे मला होणार्या वेदना न्यून झाल्या आहेत’, याची जाणीव होऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
४. प्रकृती ठीक झाल्यानंतर संगणक शिकणे
माझे शस्त्रकर्म झाल्यानंतर दीड मासाने मी टंकलेखन शिकण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी मी कधीच संगणक हाताळला नव्हता. मला वाटायचे, ‘मला इंग्रजी येत नाही. या वयात मला संगणक शिकता येईल का ?’ तेव्हा माझी मुलगी सोनाली मला म्हणाली, ‘‘आई, तू संगणक शिकू शकते.’’
मी श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६३ वर्षे) यांना माझ्या मनातील नकारात्मक विचार सांगितला. श्रीमती मनीषा गाडगीळ यांनी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करायला सांगितली. त्यांच्या बोलण्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. नंतर मी प्रतिदिन १ – २ घंटे सेवा करू लागले. तेव्हा ‘गुरुकृपेने सगळे शक्य होते’, याची मला अनुभूती आली.
५. कृतज्ञता
या कालावधीत प.पू. गुरुमाऊलींच्या कृपेने मला कोणत्याही गोष्टीची उणीव भासली नाही. मी प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती संध्या तबाजी बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |