‘सध्या संपूर्ण विश्व आपत्काळ अनुभवत आहे. या आपत्काळामध्ये मनुष्याला असलेला एकमेव आधारस्तंभ म्हणजे ‘ईश्वर’ होय ! दुर्दैव असे की, जन्मदाता, सृष्टीकर्ता आणि पालनकर्ता असणारा ईश्वरच कोणाला स्मरणात नाही. मनुष्याने पृथ्वी आणि निसर्ग यांचा नाश केला; मात्र त्या वेळी ईश्वर साक्षीभावाने पहात होता. आता मनुष्याने केलेला र्हास एवढा वाढला आहे की, ईश्वर त्याचा साक्षीभाव सोडून मनुष्याला दंड देत आहे. ईश्वर ऊन किंवा पाऊस देतांना पक्षपात करत नाही. तसेच ईश्वर ‘समष्टी दंड’ देतो, तेव्हाही तो पक्षपात करत नाही. ‘धर्माचरण’ केल्यास समष्टी दंड अल्प प्रमाणात सोसावा लागतो. हे सर्व समष्टीच्या दृष्टीने झाले; मात्र जे सनातनचे साधक ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करत आहेत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आहेत, त्यांच्यासाठी आपत्काळ कसा असेल आणि या आपत्काळात साधकांसाठी सनातनचे तीन गुरु, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ कशी कृपा करत आहेत, ते आता आपण पाहूया….
शाश्वत गुरुतत्त्व मोक्षापर्यंत साधकांची काळजी घेत असणेआपत्काळात जिवंत रहाणे महत्त्वाचे आहे. वर्ष २०२० ते २०२५ या ५ वर्षांच्या कालावधीमध्ये तीव्र आपत्काळ असणार आहे. अशा काळामध्ये सर्वसामान्य लोकांना होतात, तसेच शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास काही साधकांनाही होतील. प्रारब्धानुसार काही साधकांचा आजाराने, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा युद्धामुळे मृत्यूही होईल. या सर्व परिस्थितीमध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे ‘गुरुतत्त्व’ सनातनच्या तीन गुरूंच्या रूपात, म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ यांच्या रूपाने साधकांच्या पाठीशी असणार आहे. ‘गुरु’ केवळ शिष्याची एक जन्माची नव्हे, तर मृत्यूनंतरचे जीवन आणि पुढील सर्व जन्म यांची काळजी घेतात. शिष्याला ‘मोक्षाला’ नेईपर्यंत ‘गुरु’ त्याच्या पाठीशी असल्याने साधकांची सर्वतोपरी काळजी घेणारे केवळ ‘गुरुच’ असतात ! |
आपत्काळ येण्यापूर्वीच साधकांना विविध दैवी उपाय सांगून त्यांना आपत्काळासाठी सिद्ध बनवणारे द्रष्टे गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले !
१. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने सात्त्विक उत्पादनांच्या सुगंधाच्या माध्यमातून श्वासनलिकेची शुद्धी होणे
वर्ष २००६-२००७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काही साधकांना ‘उदबत्ती, साबण आणि अत्तर कसे बनवता येतील ?’, याचा अभ्यास करायला सांगितले. गुरुदेवांच्या कृपेने काही मासांतच ही प्रक्रिया पूर्ण होऊन सनातनच्या साधकांना ‘सनातन उदबत्ती’, ‘सनातन अत्तर’ आणि ‘सनातन साबण’ मिळाले. यानंतर ‘सनातन अष्टगंध’ आणि ‘सनातन उटणे’ही आले. साधकांना या सर्व सात्त्विक उत्पादनांच्या माध्यमातून अनेक वर्षे आधीपासूनच श्वासनलिकेत दैवी चैतन्य मिळाले. या सुगंधरूपी दैवी चैतन्यामुळे साधकांच्या श्वासनलिकेची शुद्धी झाली.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपत्काळाच्या आधीच साधकांच्या श्वासनलिकेमध्ये वैकुंठातील दैवी चैतन्य साठवणे
२ अ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०१० पासून भिमसेनी कापराचा दीर्घ सुगंध घेण्याचा उपाय सांगितलेला असणे : सध्या कोरोना विषाणूने मनुष्याला वाकवले आहे. हा विषाणू श्वासनलिकेच्या माध्यमातून शरिरात जातो. वर्ष २०१० पासूनच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना भिमसेनी कापराचे उपाय करायला सांगितले आणि साधक भिमसेनी कापराने दीर्घ श्वास घेत उपाय करायला लागले.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना वर्ष २०१० मध्ये एकदा श्रीविष्णूचे निळ्या हातांचे दर्शन झाले. तेव्हा श्रीविष्णूच्या हातात कापूर होता. श्रीविष्णूने त्यांना ‘भिमसेनी कापराने सुगंध कसा घ्यायचा ?’, हे दाखवले. त्यांनी लगेच हे सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितले. गुरुदेवांनी लगेच हे उपाय ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये छापले आणि अशा प्रकारे कापराच्या उपायाला आरंभ झाला.
२ अ २. कापूर उपाय केल्याने साधकांना ‘हरि-हर’ अशा दोन्ही तत्त्वांचा लाभ होणे : भिमसेनी कापूर इंडोनेशियातील सुमात्रा आणि बोर्निओ बेटावरील अरण्यामध्ये गजगात्र कापूर वृक्षांमध्ये सापडतो. शिवतत्त्व असलेला ‘चंद्रकिरीट’ नावाचा एक किडा कापराच्या झाडाच्या आत जाऊन त्याच्या खोडामध्ये कोरतो. तेव्हा कापराची निर्मिती होते. अशा प्रकारे शिवतत्त्व असलेल्या कापराचे उपाय भगवान श्रीविष्णूनेच सनातन संस्थेला सांगितलेले आहेत; म्हणून कापूर उपाय केल्याने साधकांना ‘हरि-हर’ अशी दोन्ही तत्त्वे लाभतात.
३. कोरोना विषाणूरूपी अनिष्ट शक्तीमुळे सप्तचक्रांवर निर्माण झालेले आवरण दूर होण्यासाठी गुरुदेवांनी सप्तचक्रांशी संबंधित नामजपादी उपाय सांगणे
‘अधर्म एव मूलं सर्वरोगाणाम् ।’ म्हणजे ‘अधर्म हाच सर्व रोगांचे (आधिभौतिक म्हणजे शारीरिक, आधिदैविक म्हणजे दैवी शक्तींमुळे झालेल्या, म्हणजेच आध्यात्मिक आणि मानसिक) मूळ आहे’, असे धर्मशास्त्र सांगते. आपल्या ॠषिमुनींनी ‘कोणत्याही रोगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम असतात’, हे आधीच शोधले आहे. ज्याप्रमाणे अन्य रोगांमुळे शरिरातील सप्तचक्रांवर काळे आवरण येते, त्याचप्रमाणे कोरोना विषाणूरूपी अनिष्ट शक्तीमुळे शरिराच्या सप्तचक्रांवर दाट असे काळे आवरण येते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून गेली अनेक वर्षे सप्तचक्रांशी संबंधित नामजपादी उपाय करवून घेतले आहेत. त्यामध्ये हाताने सप्तचक्रांवर आलेले आवरण काढणे, सप्तचक्रांवर हाताने न्यास आणि मुद्रा करणे, सप्तचक्रांवर देवतांची नामपट्टी किंवा चित्र लावणे आदी अनेक उपाय गुरुदेवांनी साधकांकडून करवून घेतले.
४. अणूयुद्धाशी लढण्यासाठी ‘आकाशतत्त्वा’शी संबंधित ‘खोक्यांचा उपाय’ सांगणे
आपत्काळाचा आरंभ ‘कोरोना विषाणू’ने झाला आहे. अनेक संत, सिद्धपुरुष, नाडीपट्टीवाचक, ज्योतिषी म्हणतात की, येणार्या काळात विश्वात अणूयुद्ध होणार आहे. अणूयुद्धात परमाणू बॉम्बचा स्फोट होत असतांना प्रचंड प्रमाणात नादशक्ती कार्यरत होते. नादशक्ती ही आकाशतत्त्वाशी संबंधित आहे. गेल्या काही वर्षांपासून गुरुदेवांनी साधकांना आकाशतत्त्वाशी संबंधित खोक्यांचा उपाय सांगितला आहे. तसेच गुरुदेवांनी अग्निहोत्राचे महत्त्व सांगणारा ‘अग्निहोत्र’ नावाचा ग्रंथही प्रकाशित केला आहे. अनेक साधकांनी अग्निहोत्राची अनुभूती घेतलेली आहे.
‘हे श्रीकृष्णा, आमचा शेवटचा श्वास असेपर्यंत सनातनच्या तीन गुरूंची सेवा करता येऊ दे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव सतत जागृत राहू दे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
आपत्काळ आणि सनातनच्या तीन गुरूंचा महिमा !कोरोना महामारीच्या कालावधीत सनातनच्या तीन गुरूंनी साधकांसाठी काय काय केले, याचा थोडा तरी उल्लेख इथे करतो. १. साधकांचा ताप तिन्ही गुरूंनी स्वतःवर घेणे : या कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा साधकांना ताप आल्याचे वृत्त तीन गुरूंना मिळायचे, त्यानंतर काही दिवस तिन्ही गुरूंचे शरीर ताप असल्यासारखे गरम असल्याचे अनुभवले. प्रत्यक्षात त्यांना ताप नव्हता; मात्र त्यांचे शरीर पुष्कळ गरम असे. ‘या वेळी तिन्ही गुरूंनी अनेक वेळा साधकांचा ताप स्वतःच्या शरिरावर घेतला’, असे मला वाटले. २. साधकांना होणारे विविध आजार वाढल्यावर तिन्ही गुरूंनाही उष्णतेचे विविध त्रास होणे : या कालावधीमध्ये अनेक साधकांचा मधुमेह आणि रक्तदाब हे आजार वाढले. माझे असे निरीक्षण आहे की, त्याच वेळी तिन्ही गुरूंना उष्णतेचे त्रास होणे, त्यांचा रक्तदाब वाढणे, तोंडाला कोरड पडणे आदी त्रास अकस्मात् चालू व्हायचे. तिन्ही गुरूंना औषधोपचार करूनही फारसा लाभ होत नसे; मात्र काही दिवसांनी सर्व लक्षणे आपोआप अल्प होत असत. ३. साधकांच्या आरोग्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अनेक होम-हवन करणे आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अनेक घंटे प्रवास करून देवाकडे साकडे घालायला मंदिरात जाणे : या कालावधीमध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अनेक होम-हवन केले. या सर्व होम-हवनांमध्ये साधकांच्या आरोग्यासाठी संकल्प करण्यात आला. काही वेळा एकाच ठिकाणी अनेक घंटे बसून असे याग करण्यात आले. याच वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधकांच्या आरोग्यासाठी दिवस-रात्र कष्ट घेतले. त्या अनेक घंटे खडतर प्रवास करून मंदिरांत गेल्या अन् त्यांनी देवाकडे साकडे घातले. हे सर्व करत असतांना त्यांनी अनेक शारीरिक त्रास सहन केले. ४. साधकांना त्रास होण्याआधी गुरूंनी त्यांना सतर्क करणे : काही वेळा तीन गुरु एखाद्या साधकाला त्रास होण्याच्या आधीच त्याला सतर्क करत असत. अशा वेळी त्यांच्या मनात त्या साधकाची आठवण होऊन त्यांनी त्या साधकाला अमुक ठिकाणी सेवेला जातांना सतर्क रहाण्यास आणि सर्व नामजपादी उपाय करायला सूचित केले, असे अनेक प्रसंग बघायला मिळाले. ५. आपत्काळात साधक गुरूंना हाक मारतांना तिन्ही गुरूही साधकांचाच विचार करत असणे : वरील सर्व सूत्रे येथे लिहिण्याचे एकच कारण म्हणजे या आपत्काळात आम्ही सनातनचे साधक ‘गुरुदेव’ ‘गुरुदेव’ ‘गुरुदेव’, असे हाक मारत असतांना सनातनचे तीन गुरु ‘माझे साधक’ ‘माझे साधक’ ‘माझे साधक’, असा जप करत होते. (साधकांचे रक्षण करण्यासाठी काय करावे, याचा त्यांना ध्यास लागला होता.) हे सर्व बघून प.पू. भक्तराज महाराजांच्या भजनातील ‘देवा हे प्रेम कसे’, या ओळीची आठवण आली. |
आपत्काळात मानसिक स्थैर्य आणि मन उत्साही रहाण्यासाठी गुरुदेवांनी साधकांकडून स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करवून घेणे
ईश्वरप्राप्तीमध्ये असलेले मुख्य अडथळे म्हणजे ‘स्वभावदोष’ आणि ‘अहं’वर मात करण्यासाठी गुरुदेवांनी सर्व साधकांना ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ आणि ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ शिकवली. गेल्या काही वर्षांपासून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या सर्व मार्गदर्शक संतांच्या माध्यमातून साधकांकडून या दोन्ही प्रक्रिया करवून घेत आहेत. यामुळे साधकांमध्ये असलेले काळजी करणे, भावनाशीलता, निराशा, चिडचिड, आळस, गांभीर्य अल्प असणे, नकारात्मक विचार करणे, न्यूनगंड आदी स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू अल्प झाले आहेत. या सर्वांचे लाभ साधकांना दळणवळण बंदीच्या काळात लक्षात आले.
कोरोना व्याधीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काही जणांना ‘पुढे काय होईल ?’, या विचाराने नवीन आजार चालू झाले. या सर्व परिस्थितीत सनातनचे साधक स्थिर आहेत आणि सर्व परिस्थितीला आनंदाने सामोरे जात आहेत. याचे कारण म्हणजे ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ आणि ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’.
शाश्वत असलेल्या ‘गुरुतत्त्वाचे’ चरण धरूया आणि ‘ते चरण कधीही सोडणार नाही’, असा निश्चय करूया !
साधकांनो, आपत्काळाच्या आधीही गुरु आपल्या समवेत होते, आपत्काळातही आपल्या समवेत असतील आणि आपत्काळ झाल्यावरही आपल्या समवेत असणार आहेत. वरील तीन कालखंडाचे अवलोकन केले, तर लक्षात येईल की, आपत्काळ हा अशाश्वत आहे आणि ‘गुरुतत्त्व’ हेच शाश्वत आहे. त्यामुळे आपण शाश्वत असलेल्या गुरुतत्त्वाचे चरण धरूया आणि ‘परिस्थिती कशीही असो ते चरण सोडणार नाही’, असा निश्चय करूया.
– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.४.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक