सातारा, ८ मे (वार्ता.) – जिल्ह्यातील ज्या रुग्णांना जागेअभावी गृह विलगीकरणात रहाणे शक्य नाही, अशा रुग्णांसाठी रयत शिक्षण संस्थेची महाविद्यालये कह्यात घेऊन तेथे विलगीकरण कक्ष स्थापन करावेत, अशा सूचना भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या एका बैठकीत ते बोलत होते. या वेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
खासदार उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की, पंतप्रधान निधीतून जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात येणार आहे. भविष्यात ‘राष्ट्रीय आपदा राहत निधी’ आणि ‘राज्य आपदा राहत निधी’च्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात १७ ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याचे नियोजन आहे. यातील १२ ऑक्सिजन प्लॅन्ट ग्रामीण भागात तर उर्वरीत शहरी भागात उभारण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील प्लॅन्टसाठी संमती देण्यात आली असून उर्वरीत ठिकाणच्या संमती प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होणे आवश्यक आहे. याविषयी आम्ही प्रशासनास लागेल ते साहाय्य करण्यास कटिबद्ध आहोत. काही ठिकाणी १०८ क्रमांकावर संपर्क केल्यानंतर रुग्णवाहिका न येण्याचे प्रकार घडत आहेत. बेड असेल तरच येतो, असेही रुग्णवाहिकावाले म्हणत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. प्रशासनाने रुग्णवाहिकावाल्यांना योग्य ती समज द्यावी. अवकाळी पावसामुळे वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे; मात्र अशा वेळी वीज खंडीत होता कामा नये. रुग्णालयातील ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपयोगात आणण्यात अडचणी निर्माण झाल्यास रुग्ण दगाऊ शकतात. यासाठी रयत शिक्षण संस्थेची सर्वसोयीनी युक्त अशी महाविद्यालये गृह विलगीकरणासाठी प्रशासनाने घेतल्यास इतर वैद्यकीय यंत्रणेवरील ताण अल्प होऊ शकतो.