डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे विक्रम भावे यांना सशर्त जामीन संमत !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे

मुंबई – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले ‘मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात’ या पुस्तकाचे लेखक तथा हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे यांना ६ मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन संमत केला. २५ मे २०१९ या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून मुंबई येथे श्री. विक्रम भावे यांना अटक करण्यात आली होती. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना ‘रेकी’ (ठिकाणाचे निरीक्षण) करण्यास साहाय्य केल्याच्या ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. श्री. भावे यांच्या जामिनाला स्थगिती मिळावी, यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने न्यायालयात अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती एस्.एस्.शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या विभागीय खंडपिठाने श्री. भावे यांचा जामीन संमत केला.

श्री. भावे यांना जामीन संमत करतांना न्यायालयाने त्यांना १ लाख रुपयांचा जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेचे १ किंवा २ हमीदार या अटींसह पुढील बंधने घातली आहेत. न्यायालयाच्या परिक्षेत्राच्या बाहेर न जाणे, आठवडाभर नियमित आणि त्यानंतर पुढील २ मास आठवड्यातून २ वेळा पोलीस ठाण्यात उपस्थित रहाणे, खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत आठवड्यातून एकदा पोलीस ठाण्यात उपस्थित रहाणे ही बंधने असणार आहेत. श्री. भावे यांचे पारपत्र केंद्रीय अन्वेषण विभागाकडे जमा करण्यात येणार आहे. साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणू नये, पीडितांच्या कुटुंबाशी कोणत्याही प्रकारे संपर्क करू नये आणि पुराव्यांशी छेडछाड करू नये, तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्यांत सहभागी होऊ नये, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत. ‘यांपैकी कोणत्याही अटीचे उल्लंघन केल्यास जामीन रहित होईल’, असे निर्णय देतांना खंडपिठाने स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण ?

१. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणात प्रथम सारंग अकोलकर आणि विनय पवार हे मुख्य आरोपी असल्याचे आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनी त्यांना सहकार्य केल्याचे अन्वेषण यंत्रणेकडून सांगण्यात येत होते.
२. त्यानंतर अन्वेषण यंत्रणेकडून सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना अटक करून दाभोलकर हत्या प्रकरणात ते मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात आले.
३. कर्नाटक पोलिसांकडील १२ ऑक्टोबर २०१८ या दिवसाच्या शरद कळसकर यांच्या कथित वक्तव्यावरून साडेआठ मासांनंतर या प्रकरणात अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे सहभागी असल्याचा ठपका ठेवून त्यांना अटक करण्यात आली.

विक्रम भावे यांना गुंतवण्याचा प्रयत्न करणारे अदृश्य हात कुणाचे ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

‘मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात’, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर पुस्तक लिहून अनेक सूत्रांवर प्रकाश टाकणारे पुस्तकाचे लेखक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांना उच्च न्यायालयाने दिलेला जामीन हा नक्कीच स्वागतार्ह आहे. भावे यांनी बाळगंगा धरणातील अनेक घोटाळे उघडकीस आणले आहेत. ‘एक ना एक दिवस सत्य समोर येतेच’, याच्यावर आमचा विश्‍वास आहे. ही लढाई संपलेली नसून चालू आहे. या आधीही वर्ष २०१३ मध्ये विक्रम भावे यांना गुंतवण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न करणारे अदृश्य हात कुणाचे ? याचा शोध होणे आता आवश्यक आहे.