नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – बीडमधील माजलगाव तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की, विशेष पोलीस पथकाद्वारे आणि न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. या प्रकरणातील दोषींना मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) लावण्यात येईल. मागील २ दिवस याविषयी स्थगन प्रस्तावाच्या अंतर्गत चर्चा झाली. त्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली.
या प्रकरणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांचे स्थानांतर करण्याचा आदेशही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिला. या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘या प्रकरणामध्ये एका आस्थापनाने पवनचक्कीच्या निर्माण कामात गुंतवणूक केली आहे. या कामावरून काही लोकांमध्ये वाद होता. ६ डिसेंबर या दिवशी दुपारी पवनचक्कीचे निर्माण करणार्या आस्थापनाच्या कार्यालयात जाऊन काही लोकांनी आस्थापनाचे व्यवस्थापक आणि सुरक्षारक्षक यांना मारहाण केली. व्यवस्थापकाने सरपंचांना दूरभाष केला. या वेळी तेथे सरपंच आले. या वेळी मारहाण करणारे लोक आणि सरपंच यांच्यात वाद झाला. ९ डिसेंबर या दिवशी सरपंच संतोष देशमुख स्वत:च्या गाडीतून जातांना त्यांचा पाठलाग करून त्यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली.’’