नांदेड येथे कोरोनाच्या रुग्णांसह नातेवाइकांच्या साहाय्यासाठी तरुणांचा पुढाकार !

  • प्रतिदिन भोजनाच्या २०० डब्यांचे वाटप !

  • कामठा येथील ‘स्वामी ग्रुप’चा अभिनव उपक्रम !

असे तरुण सर्वत्र हवेत !

 

‘स्वामी ग्रुप’मधील तरुणांचा आदर्श

नांदेड – कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी ग्रामीण भागातील तरुण सरसावले आहेत. शहरापासून जवळच असलेल्या कामठा येथील ‘स्वामी ग्रुप’च्या वतीने रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक यांना भोजन पुरवले जात आहे. यामुळे रुग्ण आणि नातेवाईक यांना याचा लाभ होत आहे. ‘स्वामी ग्रुप’च्या माध्यमातून चालू केलेल्या या उपक्रमाचे नांदेडकरांनी कौतुक केले आहे. (‘स्वामी ग्रुप’मधील तरुणांचा आदर्श इतर सामाजिक संस्थांनी घेऊन त्यांनीही त्यांच्या जिल्ह्यात अशी सामाजिक सेवा चालू करावी, हीच जनतेची अपेक्षा आहे. – संपादक)

कोरोना आजाराच्या उपचारासाठी ग्रामीण भागातील अनेक रुग्ण रुग्णालयांत भरती झाले आहेत. ‘दळणवळण बंदी’ असल्याने त्यांच्या भोजनाची पुष्कळ हेळसांड होत होती; मात्र श्री. शुभम स्वामी या तरुणाने पुढे येत ‘स्वामी ग्रुप’च्या माध्यमातून रुग्णांना भोजनाचे डबे वाटपाचे काम चालू केले आहे. सकाळी १०० आणि सायंकाळी १०० अशा २०० डब्यांचे वाटप केले जात आहेत. गनपूर कामठा येथे स्वयंपाक सिद्ध केला जातो. या कामासाठी ‘स्वामी ग्रुप’मधील सदस्य पुढे आले आहेत.

श्री. शुभम स्वामीचे ‘स्वामी ग्रुप’च्या माध्यमातून रुग्णांना भोजनाचे डबे वाटप

दूरभाषवरून नोंदणी केली जाते !

‘कोरोनाचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना भोजनाचे डबे हवे असल्यास त्यांनी दूरभाषवर संपर्क साधायचा आहे. ज्या रुग्णालयातून नातेवाइकांनी नावनोंदणी केली आहे, तिथे जाऊन ग्रुपचे सदस्य डबे वाटप करतात. यामुळे रुग्णांनाही वेळेवर डबे मिळण्यास साहाय्य होत आहे’, असे ‘स्वामी ग्रुप’चे प्रमुख शुभम स्वामी यांनी सांगितले.

स्वयंस्फूर्तीने तरुण आले पुढे !

घरातील सर्व कामे सोडून ‘स्वामी ग्रुप’चे तरुण दिवसरात्र रुग्ण सेवेसाठी वेळ देत आहेत. श्री. शुभम स्वामी आणि त्याचे मित्र मागील १०-१२ दिवसांपासून डबे पुरवण्याचे काम करत आहेत. सकाळी भाजीपाला घेण्यापासून ते स्वच्छ धुणे, कापणे आणि स्वयंपाक पूर्ण करून ते रुग्णांपर्यंत पोचवण्याचे काम तरुण करत आहेत. त्यामुळे रुग्णांनाही ‘स्वामी ग्रुप’च्या डब्याचा आधार मिळत आहे.