नगर, १ मे – येथील नालेगाव स्मशानभूमी मध्यवर्ती शहराच्या लगत आहे. येथे होत असलेल्या कोविड रुग्णांच्या अंत्यविधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने कोविड रुग्णांच्या अंत्यविधीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच नालेगाव स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यविधी करण्यास विरोध दर्शवत नालेगाव स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेहांच्या अंत्यविधी व्यतिरिक्त इतर अंत्यविधी करावेत, अशी मागणी नालेगावातील नागरिकांनी केली आहे.
नालेगाव गावठाण, सुडकेमळा, बागरोजा हडको, देहलीगेट, पटवर्धन चौक, कल्याण रस्ता परिसर, ठाणगे मळा या परिसरात दाट लोकवस्ती आहे. कोरोनाबाधितांच्या अंत्यविधीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे स्मशानभूमीच्या आजूबाजूला असलेल्या परिसरातील नागरिकांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.