५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. अधिरा अंकेत पांडे (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अधिरा अंकेत पांडे ही एक आहे !

चैत्र कृष्ण पक्ष पंचमी (१ मे २०२१) या दिवशी चि. अधिराचा दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिची आई आणि आजोबा (आईचे वडील) यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. अधिरा पांडे

चि. अधिरा अंकेत पांडे हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी

१ अ. गर्भारपणात परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आवाजातील मंत्र ऐकल्यावर होणारा त्रास उणावणे आणि मंत्र म्हणत असतांना पोटातील बाळाच्या हालचालींवरून बाळ त्या मंत्रांना प्रतिसाद देत असल्याचे जाणवणे : ‘गर्भारपणात मला पुष्कळ त्रास होत असे. सनातनचे संत पू. पात्रीकरकाका यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी मला परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आवाजातील काही मंत्र पाठवले. त्यामुळे मला होणारा त्रास हळूहळू उणावला. मंत्र म्हणत असतांना मला पोटात बाळाची हालचाल जाणवायची. ‘त्या मंत्रांना बाळ प्रतिसाद देत आहे’, असे मला जाणवायचे.

१ आ. ‘मुलगी व्हावी’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना प्रार्थना करणे : गर्भारपणात त्रास होत असल्याने ‘तुला मुलगा होणार’, असे मला बरेच जण म्हणायचे; पण मला मुलगी हवी होती. मी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘मला मुलगी होऊ द्या’, अशी सतत प्रार्थना करत होते. शस्त्रकर्मकक्षात जातांनाही मी ‘मला मुलगी होऊ द्या’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांना कळकळीने प्रार्थना केली. त्यांच्याच कृपेने मला हे कन्यारत्न प्राप्त झाले.

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते ५ मास

१. देवाविषयी असलेली ओढ

अ. चि. अधिरा २ मासांची असल्यापासून श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्याशी ओळख असल्याप्रमाणे सतत श्रीकृष्णाच्या चित्राकडे अन् परात्पर गुरु डॉक्टर यांच्या छायाचित्राकडे पहात असे.

आ. आम्ही तिच्या जवळ श्रीकृष्णाचे लहान चित्र आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ नेहमी ठेवतो. तिला या दोन्हींशी बोलायला आणि खेळायला पुष्कळ आवडते.

२ आ. ६ मास ते १ वर्ष

२ आ १. ती सतत आनंदी असते.

२ आ २. तिला घरी पाहुणे आलेले आवडतात. ती त्यांच्याशी खेळते.’ – सौ. निकिता पांडे (आई), पुणे

२ आ ३. सात्त्विकतेची ओढ

अ. ‘तिला देवघरातील किंवा तुळशी वृंदावनाजवळ लावलेला तेलवातीचा दिवा फार आवडतो. ती त्या दिव्यांकडे एकटक पहात असते. तिला उदबत्तीचा धूरही पुष्कळ आवडतो.

आ. तिला उदबत्तीची विभूती खायला आवडते. ती विभूती पुनःपुन्हा मागते.

इ . दत्ताच्या चित्रातील गाय आणि कुत्रे हे तिला फार आवडतात. तिला बाहेर घेऊन गेल्यावर कुत्रे किंवा गाय दिसली, तर ‘तिकडे घेऊन चल’, असा ती हट्ट करते.

ई. दूरदर्शनवरील ‘साईबाबा’ या मालिकेत ‘साईबाबा’ पडद्यावर दिसतात, तोपर्यंत ती दूरदर्शन पहाते. ते दूरदर्शनच्या पडद्यावर दिसेनासे झाल्यावर ती दूरदर्शनकडे पहातही नाही.’ – श्री. प्रदीप गर्गे (चि. अधिराचे आजोबा (आईचे वडील), अमरावती)

२ आ ४. देवाची ओढ

अ. ‘तिला ‘शुभं करोति’ हा श्लोक आणि रामरक्षा स्तोत्र ऐकायला फार आवडते. तिचे आजोबा तिला मांडीवर घेऊन श्लोक आणि स्तोत्र म्हणत असतांना ती शांतपणे त्यांच्या मांडीवर बसते.

आ. आपत्काळात म्हणायला सांगितलेले मंत्र (ऑडिओ) आम्ही घरात लावून ठेवतो. तेव्हा ती ते मंत्र शांतपणे ऐकते.

इ . ती झोपतांना नेहमी तर्जनीला अंगठ्याचे टोक लावून ध्यानमुद्रा करून झोपते आणि ती मुद्रा रात्रभर तशीच असते.

२ आ ५. परात्पर गुरु डॉक्टरांविषयी असलेली ओढ

अ. ती हट्ट करते आणि रडते किंवा काही खात नाही, तेव्हा तिला ‘अप्पा महाराज यांना (परात्पर गुरु डॉक्टरांना ती ‘अप्पा महाराज’ म्हणून ओेळखते.) असे केलेले आवडत नाही’, असे सांगितले की, ती शांत होते आणि खायला लागते.

आ. ती ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ उघडून त्यातील विविध छायाचित्रे पहाते. तेव्हा ती त्यांच्याशी बोलते आणि हसतेही. ती रात्री झोपण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे तो ग्रंथ घेते आणि नंतरच झोपते.’ – सौ. निकिता पांडे

इ . ‘तिला कोणतीही वस्तू तोंडात घालायची सवय आहे. तिने तोंडात काही घातले असतांना तिला ‘अप्पा महाराज रागावतात. तोंडातले काढ’, असे सांगितल्यावर ती लगेच तोंडातील वस्तू बाहेर काढते.’ – श्री. प्रदीप गर्गे

३. स्वभावदोष : हट्टीपणा

गुरुदेवांनी हे सर्व माझ्याकडून लिहून घेतले, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’- सौ. निकिता पांडे, पुणे (७.४.२०२०)