‘९.११.२०२४ या दिवशी लक्ष्मण धोंडिबा जुनघरे (वय ८५ वर्षे) यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या धाकट्या सुनेला (सौ. अमृता जुनघरे यांना) त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये, ते रुग्णाईत असतांना आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. शांत
‘माझे सासरे (बाबा) त्यांच्या ४ सुनांवर कधीच रागावले नाहीत.
२. स्वावलंबी
बाबांच्या दिनक्रमात कधीही पालट झाला नाही. ते स्वतःचे कपडे स्वतःच धूत असत. ते नेहमी ‘त्यांचे कुणाला करावे लागू नये’, याची काळजी घेत असत.
३. धार्मिक वृत्ती
अ. ते नित्य नेमाने देवपूजा करून हरिपाठ म्हणत असत. ते माळ घेऊन एकाग्रतेने नामजप करत असत.
आ. ते ज्ञानेश्वरी वाचत असत. त्यांचे शिक्षण झाले नसल्याने ते आरंभी ज्ञानेश्वरी वाचू शकत नसत. त्यांना कोणीतरी सांगितले होते, ‘‘ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवल्यावर ज्ञानेश्वरी आपोआप वाचता येते.’ बाबांनी त्यानुसार केल्यावर काही कालावधीने त्यांना ज्ञानेश्वरी वाचता येऊ लागली. ते माझ्या यजमानांना (श्री. विक्रम जुनघरे यांना) सांगायचे, ‘‘ज्ञानेश्वरी वाचत जा. सर्व अडचणी सुटतील.’’
इ. बाबा गावाला (मेढा, जिल्हा सातारा येथे) गेल्यावर नित्यनेमाने दत्त आणि शिव यांच्या मंदिरात जाऊन दिवा लावायचे.
ई. ते माझ्याशी नेहमी भगवंताविषयीच बोलत असत. तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद होत असे.
उ. बाबांनी त्यांना मिळालेली ज्ञानेश्वरी मला दिली होती. मी ती गरोदर असतांना वाचली होती.
४. विठ्ठलाप्रती भाव
अ. बाबा वारकरी संप्रदायातील होते. ते कोणतीच वारी चुकवायचे नाहीत. ते त्यांच्या वयाच्या ८४ व्या वर्षापर्यंत वारीला पायी जात असत.
आ. त्यांची विठ्ठलावर पुष्कळ श्रद्धा होती. ते नेहमी मला सांगायचे, ‘‘माझा भगवंत पंढरपूर येथे आहे.’’
५. रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे
अ. ऑगस्ट २०२४ पासून बाबांना शरिरात वेदना होणे, पोट फुगणे आणि शरिरावर सूज येणे, असे त्रास चालू झाले. त्यांची वैद्यकीय चाचणी केल्यावर ‘त्यांच्या हाडांमध्ये कर्करोग पसरलेला आहे’, असे निदान झाले. आम्ही त्यांना उपचार करण्यासाठी रुग्णालयात भरती केले.
आ. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी बाबांसाठी नामजपादी उपाय सांगितले. माझे यजमान बाबांसाठी नामजपादी उपाय करत असत.
इ. बाबा रुग्णाईत असतांनाही एकादशीनिमित्त उपवास करत असत. ते भ्रमणभाषवर कीर्तन ऐकत असत आणि मोठ्याने हरिपाठ म्हणत असत. एकदा तेथील परिचारिकांनी सांगितले, ‘‘आम्ही असा रुग्ण प्रथमच पहात आहोत.’’
ई. आधुनिक वैद्यांनी बाबांना शरिरात शक्ती येण्याच्या दृष्टीने मांसाहार करण्यास सांगितले होते. तेव्हा बाबांनी आम्हाला सांगितले, ‘‘मी मेलो तरी चालेल; पण मी मांसाहार करणार नाही.’’
उ. बाबांनी स्वतःच्या आजारपणाची परिस्थिती पूर्णपणे स्वीकारली होती. बाबांना ‘कुटुंबियांना कोणताही त्रास होऊ नये’, असे सतत वाटत होते.
ऊ. बाबा रुग्णाईत असतांना माझ्या यजमानांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी बाबांना भेटायला आले होते. त्यांना बाबांकडे बघून ‘बाबा पुष्कळ सकारात्मक आहेत’, असे जाणवले.
ए. बाबांना रुग्णालयातून घरी आणल्यावर त्यांनी ‘राम कृष्ण हरि’, असे म्हणत नाचतच घरात प्रवेश केला.
ऐ. एकदा सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या (समष्टी) संत) यांना मी माझ्या सासर्यांचे छायाचित्र दाखवले. तेव्हा ‘त्यांची दृष्टी बाबांच्या छायाचित्रावर पडल्यावर बाबांचे त्रास दूर झाले’, असे मला वाटले.
ओ. बाबांच्या पूर्ण शरिरात कर्करोग पसरला होता. त्यांना असह्य वेदना होत होत्या; परंतु हे सर्व ते भगवंतावरील श्रद्धेमुळे सहन करू शकले. ते आम्हाला म्हणायचे, ‘‘आता बस झाले ! आता किती जगणार ? माझ्या अंतिम यात्रेत रडू नका. मला भजन, कीर्तन करून घेऊन चला. मला पुन्हा जन्म नाही. तुम्ही रडला नाहीत, तरच मी मोक्षाला जाईन.’’
६. ९.११.२०२४ या दिवशी बाबांचे निधन झाले.
७. बाबांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे
अ. बाबांचे निधन दिवाळी झाल्यावर झाले. ‘कुटुंबियांना सण साजरे करतांना अडचण येऊ नये’, यासाठी त्यांनी स्वतःचा मृत्यू पुढे ढकलला’, असे मला वाटले.
आ. बाबांच्या मृतदेहाकडे पाहिल्यावर ‘त्यांचे ओठ हलत आहेत आणि ते नामजप करत आहेत’, असे मला जाणवले. बाबांचा चेहरा पुष्कळ सात्त्विक वाटला. ‘ते ध्यान लावून बसले आहेत’, असे मला जाणवले.
इ. त्यांच्या निधनानंतर तिसर्या दिवशी घरात भजनाचा कार्यक्रम झाला. भजन झाल्यावर घरातील वातावरण पुष्कळ सात्त्विक वाटले. ‘घरी काही दुःखद घटना घडली’, असे मला वाटले नाही. ‘बाबांनाही आनंद झाला आहे’, असे मला जाणवले.
ई. त्यांच्या निधनानंतरच्या तेराव्या दिवसाचे विधी चालू असतांना घरातील वातावरण पुष्कळ प्रसन्न होते. माझी आई सौ. विद्यागौरी गुजर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५८ वर्षे) हिलासुद्धा असेच जाणवले.
उ. माझ्या आईला माझ्या सासर्यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘ते तेजस्वी दिसत आहेत’, असे जाणवले.
‘गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) माझ्याकडून ही सूत्रे लिहून घेतली’, त्याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. अमृता विक्रम जुनघरे (कै. लक्ष्मण धोंडिबा जुनघरे यांची धाकटी सून), पनवेल, जिल्हा रायगड. (३०.११.२०२४)