पुणे – देहविक्रय करणार्या महिलांच्या साहाय्य योजनेतील फसवणुकीने जमा केलेले पैसे परत घ्या आणि ज्याचे त्याला द्या. हे कारस्थान करणार्यांचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करीत कष्टकरी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर २९ एप्रिल या दिवशी आंदोलन केले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना त्यांनी मागणीचे निवेदन दिले.
स्वयंसेवी संस्थेच्या म्हणवणार्या ३ महिलांनी हडपसर भागातील घरकामगार, गृहसेविका, कष्टकरी महिलांना गाठून केंद्र सरकारच्या योजनेतून प्रत्येकी १५ सहस्र रुपयांचे साहाय्य करणार असल्याचे सांगितले. तसेच काही दिवसातच जमा झालेल्या रकमेतील निम्मे आम्हाला परत करावे लागतील, असे या महिलांना सांगण्यात आले. अल्पशिक्षित, निरक्षर महिलांनी आपली कागदपत्रे संस्थेच्या महिलांच्या हवाली केली. २३ एप्रिल या दिवशी काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले. देहविक्रय करणार्या महिलांच्या योजनेचे पैसे कष्टाची कामे करणार्या महिलांच्या खात्यात जमा झाल्याचे या महिलांना समजले. त्याविषयीची माहिती घेतल्यानंतर तसा प्रकार झाल्याची कष्टकरी महिलांची निश्चिती झाली. या फसवणुकीने संतप्त झालेल्या महिलांनी सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार आणि अखिल भारतीय बहुजन सेनेचे संस्थापक नीलेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली.