संभाजीनगर येथे दळणवळण बंदीमुळे १ सहस्र ४०० विवाह सोहळे तूर्तास रहित !

संभाजीनगर – दळणवळण बंदीमुळे एप्रिल-मे मधील १ सहस्र ४०० विवाह सोहळे अडचणीत आले आहेत. शासनाने लागू केलेल्या २५ सदस्यांच्या उपस्थितीमधील विवाहाला अनुकूलता नाही. यामुळे मंगल कार्यालयांसमवेतच पुरोहित, वाजंत्री, बॅण्ड, केटरिंग, फुलवाले अशा १० ते १२ व्यवसायांवर गदा आली आहे. मेमध्ये मंगल कार्याच्या ४६ तारखा असून त्याविषयीही साशंकता व्यक्त होत आहे.

राज्यामध्ये २२ ते ३१ एप्रिल या कालावधीत लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीच्या नवीन नियमावलीत विवाह सोहळ्यांसाठी केवळ २ घंटे आणि तेही २५ जणांच्या उपस्थितीलाच अनुमती देण्यात आली आहे. यामुळे बहुतांश यजमान विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेत आहेत. वर्षभरामध्ये आधीच डबघाईला आलेला विवाह क्षेत्राशी संबंधित बाजार या निर्णयामुळे हवालदिल झाला आहे.