संभाजीनगर येथील मिनी घाटी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या गळक्या सिलिंडरमुळे रुग्णाचा तडफडून मृत्यू

रुग्णाला आधी लावले होते ऑक्सिजनचे रिकामे सिलिंडर !

घाटी जिल्हा रुग्णालयातील रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी, तसेच आधुनिक वैद्यांकडून रुग्णांवर व्यवस्थित उपचार न होणे, असे प्रकार अनेकदा घडले आहेत. तरीही रुग्णालय प्रशासन सुस्त आहे.  या प्रकरणी सरकारने लक्ष घालून घाटी रुग्णालयातील भोंगळ कारभार थांबवावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !

प्रतीकात्मक छायाचित्र

संभाजीनगर – येथील अपोलो रुग्णालयात उपचार घेणारे सुनील मगरे यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे २७ एप्रिलच्या रात्री आधुनिक वैद्यांनी मगरे यांना मिनी घाटी जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी पाठवले. रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात आणल्यानंतर रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी त्यांना ऑक्सिजनचा रिकामा सिलिंडर लावला. त्यामुळे सुनील यांना श्‍वास घेण्यास त्रास झाला. मग आरोग्य कर्मचार्‍यांनी आधीचा सिलिंडर काढून दुसरा सिलिंडर लावला; पण त्यातून ऑक्सिजनची गळती होत होती. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनीच पळत जाऊन तिसरा सिलिंडर आणला; पण तोपर्यंत सुनील यांचा तडफडून मृत्यू झाला होता. एका महिला कर्मचार्‍याने त्यांच्या मृत्यूनंतर पंपिंग चालू केले होते; पण आधुनिक वैद्य ‘कॅज्युअल्टी’तून रुग्णवाहिकेपर्यंत आले नाहीत, असा नातेवाइकांचा आरोप आहे. (रुग्णालय प्रशासनाने या आरोपातील सत्यता पडताळून ते जनतेसमोर आणावे ! – संपादक) ही घटना सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. या संदर्भात ‘चौकशी समिती नियुक्त केली आहे’, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी दिली.