गाजरवाडीच्या शेजारच्या गावांमध्ये गारांचा पाऊस पडून द्राक्षबागांची हानी होणे; परंतु गाजरवाडी येथे गारा न पडणे
‘२५.३.२०२० या गुढीपाडव्याच्या दिवशी नाशिक येथील काही गावांत दुपारी ४ वाजता अकस्मात् पाऊस चालू झाला. काही ठिकाणी गाराही पडल्या. गारा पडल्याने काही गावांमधील द्राक्षबागांची पुष्कळ हानी झाली. भगवंताची इतकी कृपा की, गाजरवाडीच्या शेजारच्या गावांमध्ये गारा पडल्या, पाऊसही झाला; पण गाजरवाडी गावात एकही गार पडली नाही. गाजरवाडी आणि नैताळे या गावांच्या वेशीवर गारांचा पाऊस पडत होता अन् त्याच वेळी गाजरवाडी गावामध्ये अगदी थोडा पाऊस पडला.
‘साक्षात् श्री मारुतिरायाने गाजरवाडी गावाला गारांपासून वाचवले’, अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. असाच प्रसंग २ वर्षांपूर्वी घडला होता. तेव्हाही गाजरवाडीच्या शेजारील गावांमध्ये गारा पडत होत्या; पण गाजरवाडीमध्ये मुळीच गारा पडल्या नाही. त्या वेळीही मारुतिरायाने आम्हाला वाचवले आणि या वेळीही त्यानेच आमचे रक्षण केले. ‘भगवंत भक्तांचे कसे रक्षण करतो ?’, याची प्रचीती आम्ही घेतली. त्यासाठी आम्ही सर्व जण मारुतिरायांच्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– कु. प्रियांका शिंदे, गाजरवाडी, निफाड, नाशिक. (११.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |