कणकवली – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोल्हापूर यांना जोडणारा भुईबावडा घाट मार्गावर माती टाकून बंद करण्यात आला होता; मात्र या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि वाहनचालक यांना होत असलेल्या असुविधेची नोंद घेत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने २५ एप्रिलला सकाळी हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत् केला आहे.
हा मार्ग बंद झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणारे प्रवासी, तसेच वाहनचालक यांच्याकडून अप्रसन्नता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर ‘हा मार्ग चालू करावा’, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी केली होती, तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत चर्चाही केली होती. त्यानुसार सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकार्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर हा मार्ग मोकळा करण्यात आला.