विरारमधील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा मृत्यू

मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांचे, तर पंतप्रधानांकडून २ लाख रुपयांचे साहाय्य घोषित

वारंवार घडणार्‍या अशा घटना शासकीय यंत्रणांना लज्जास्पद ! गेल्या काही मासांत घडलेल्या अशा घटनांतून काहीही न शिकणार्‍या अन् रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या प्रशासनातील उत्तरदायींना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे, असेच नागरिकांना वाटते !

विरारमधील कोविड रुग्णालय

ठाणे, २३ एप्रिल (वार्ता.) – नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांनी प्राण गमावल्याची घटना ताजी असतांनाच विरार (पश्‍चिम) येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतीदक्षता विभागात २२ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा मृत्यू झाला. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाख रुपये, तर गंभीर घायाळ रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे साहाय्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही मृतांच्या कुटुंबियांंना २ लाख रुपयांचे, तर घायाळांच्या कुटुंबियांना ५० सहस्र रुपयांचे साहाय्य घोषित करण्यात आले आहे.

विरार येथील चार मजली रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावर असलेल्या वातानुकूलित यंत्रात मध्यरात्री ३.१५ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याने ही आग लागली, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या वेळी अतीदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यांपैकी १३ रुग्णांचा आगीत मृत्यू झाला आहे. अग्नीशमनदलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवत इतर रुग्णांची सुटका केली, तर ५ रुग्णांना अन्य रुग्णालयात हालवण्यात आले आहे.

ही घटना अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

अजित पवार

ही घटना अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. राज्यातील आधुनिक वैद्य आणि परिचारिका, शासकीय अन् खासगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असतांना नाशिक किंवा विरार यांसारख्या दुर्घटना घडून त्यात रुग्ण मृत्यूमुखी पडणे, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. जिल्हाधिकार्‍यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य रुग्णांची सुरक्षितता आणि त्यांच्यावरील उपचार सुरळीत चालू रहातील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांची सुरक्षितता, तसेच अग्नीसुरक्षा यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशात अशा घटना वाढल्या आहेत. उच्चस्तरीय समितीकडून यामागील कारणांचा शोध घेऊन त्या त्रुटी कायमस्वरूपी दूर करणे, हे गांभीर्याने घेतले जाईल. मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश दिला असून त्यातून तथ्य बाहेर येईल, असा मला विश्‍वास आहे.

यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांतून बोध घेऊन त्रुटी सुधारायला हव्यात ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

राज ठाकरे

विरारमधील घटनेप्रमाणे याआधी नाशिक, भंडारा आणि भांडुप येथेही अशा स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत. या सर्वच घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य आहे; पण म्हणून या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही, असे नाही. सरकारने तातडीने उत्तरदायी अधिकार्‍यांच्या तुकड्या सिद्ध करून प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्था आणि अग्नीसुरक्षा यंत्रणांचे ऑडिट करून घ्यायला हवे. त्यात ज्या त्रुटी आढळतील, त्यावर उपाययोजना काढल्या पाहिजेत.

अशा घटना घडू नयेत, याकडे शासनाचे हवे तेवढे लक्ष नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

देवेंद्र फडणवीस

अशा घटनांचा शासनाने गांभीर्याने विचार करायला हवा. या घटनांनंतर आपण प्रतिक्रिया व्यक्त करतो; पण अशा घटना घडू नयेत, यासाठी शासनाचे हवे तेवढे लक्ष नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरार येथील दुर्घटनेनंतर पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. पुढच्या मासापर्यंत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी या वेळी फडणवीस यांनी केली. ते पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येक वेळी रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ करू’, असे सांगितले जाते; मात्र ते होतांना कुठेच दिसत नाही. कोरोनाच्या काळात रुग्णालयांवर पुष्कळ ताण आहे. अशा परिस्थितीत काहीतरी व्यवस्था उभी केली पाहिजे. अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत, यासाठी कसे करता येईल ? हे पाहिले पाहिजे. आवश्यकता असेल, तर रुग्णालयांना साहाय्य केले पाहिजे. मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबांसमवेत आमच्या संवेदना आहेत. तेथील रुग्णांची योग्य ती काळजी घेण्याची व्यवस्था शासनाने करावी. या घटनांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी शासनाने काही प्रभावी पावले उचलली पाहिजेत.’’

दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना वसई-विरार महानगरपालिकेच्या वतीने ५ लाख रुपयांचे साहाय्य ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

एकनाथ शिंदे

ठाणे, २३ एप्रिल (वार्ता.) – विरार रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना वसई-विरार महानगरपालिकेच्या वतीने ५ लाख रुपयांचे साहाय्य देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यासह अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी महानगरपालिकेचे व्हिजिलन्स पथक स्थापन करून त्यात औद्योगिक सुरक्षेशी संबंधित तज्ञांचे साहाय्य घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राजेश टोपे

विरार रुग्णालय दुर्घटना ही राज्य सरकारची अंतर्गत गोष्ट आहे. अनेक विषयांच्या संदर्भात पंतप्रधानांशी चर्चा करणार असलो, तरी विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नाही. आम्ही महानगरपालिका स्तरावर आणि राज्यस्तरावर त्यासंदर्भात निर्णय घेऊन साहाय्य करत आहोत. महानगरपालिकेकडून ५ लाख रुपयांचे आणि राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांचे, असे १० लाख रुपयांचे साहाय्य देणार आहोत. कोणत्याही इमारतीचे अग्नीसुरक्षा यंत्रणांचे ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट आणि विद्युत् ऑडिट करणे आवश्यक असते. हे नियम न पाळणार्‍या आणि त्यासंदर्भात दोषी असणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. याविषयी सखोल चौकशी करून १० दिवसांमध्ये अहवाल सादर केला जाईल.

अग्नीसुरक्षेची आवश्यक ती काळजी घेतली होती का ? याचे तातडीने अन्वेषण करा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

मुंबई – रुग्णालयाला आग कशामुळे लागली ? अग्नीसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेतली होती का ? याचे तातडीने अन्वेषण करा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागाला लागलेल्या आगीनंतर संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना दिला. आगीच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना संपर्क करून अन्य रुग्णांवर उपचार चालू रहातील, याकडे लक्ष ठेवण्याचीही सूचना केली.