गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करतांना ‘रॅपिड टेस्ट’ सक्तीची

बांदा – २१ एप्रिलपासून महाराष्ट्र-गोवा या राज्यांची सीमा महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून बंद करण्यात आली. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करतांना प्रत्येकाची ‘रॅपिड अँटिजेन’ चाचणी करूनच प्रवेश देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यशासनाने गोव्यासह इतर ६ राज्ये प्रवासासाठी संवेदनशील घोषित केली आहेत. त्यामुळे राज्याच्या सीमेवर बांदा-सटमटवाडी येथे पथकर नाक्यानजीक सीमा बंद करण्यात आली आहे.

सिंधुदुर्गात कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू

१. मृत्यू झालेले एकूण रुग्ण २३४

२. उपचार चालू असलेले रुग्ण २ सहस्र ७७७

३. बरे झालेले एकूण रुग्ण ७ सहस्र ५०९

४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण १० सहस्र ५२६

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाशी संबंधित अन्य घडामोडी

शिवसेनेच्या वतीने कुडाळ आणि कणकवली येथे विनामूल्य शिवभोजन थाळी

कणकवली – कोरोनामुळे जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीच्या पार्श्‍वभूमीवर गरीब आणि गरजू लोकांचे हाल होऊ नयेत, यासाठी शिवसेनेच्या वतीने कणकवली अन् कुडाळ येथे विनामूल्य शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले.

अनिल भिसे मित्रमंडळाकडून सावंतवाडीत पोलिसांसाठी पाण्याची व्यवस्था

सावंतवाडी – कोरोनाचा संसर्ग वाढला असतांनाही आपल्या जिवाची पर्वा न करता काम करणार्‍या येथील पोलिसांची अनिल भिसे मित्रमंडळाकडून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. यासाठी शहरातील चिटणीस नाका, जयप्रकाश चौक, शिरोडा नाका, पावसकर पेट्रोलपंप, तसेच अन्य पोलीस बंदोबस्त असलेल्या ठिकाणी असलेल्या पोलिसांना पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या.