हासन (कर्नाटक) येथे रेव्ह पार्टीवर घातलेल्या धाडीत महिला पोलीस शिपायाला अटक !

ज्यांनी कायद्याचे रक्षण करावे, तेच कायद्याचे उल्लंघन करत असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील? अशांना बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

मंगळुरू (कर्नाटक) – हासन जिल्ह्यात पोलिसांनी रेव्ह पार्टीवर घातलेल्या धाडीत मंगळुरूच्या पांडेश्‍वर येथील नार्कोटिक अँड इकॉनॉमिक क्राईम पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपाई श्रीलता यांना अटक करण्यात आली आहे, तर त्यांचा मुलगा पसार झाला आहे. श्रीलता या मूळच्या केरळ येथील आहेत. त्या गत ४ वर्षांपासून नोर्कोटिक ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी येथे एकूण १३१ लोकांना कह्यात घेतले. येथे एम्डीएम्ए, एल्एस्डी, गांजा तसेच इतर मादक पदार्थ सापडले.

१. इस्टेट मालक गगन आणि पार्टीचे आयोजन करणारे येथील सोनी, पंकज, नासीर अशा चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत महिला पोलीस आणि त्यांचा मुलगा यांचे नाव उघड झाले.

२. बेंगळुरूच्या आस्थापनात काम करत असल्याचे सांगणारा श्रीलता यांचा मुलगा अतुल याचे ‘ड्रग पेडलर’शी (अमली पदार्थ पुरवणारा) घनिष्ठ संबंध असून तो स्वतःच ‘ड्रग पेडलर’ असल्याचे सांगण्यात येते.

अतुल याने बेंगळुरू, तसेच मंगळुरू येथील मादक पदार्थ सेवन करणार्‍यांशी मैत्री केली होती. त्याच कारणाने बेंगळुरूच्या मुलांसह सकलेशपूरच्या गुप्त जागेत रेव्ह पार्टीचे आयोजन करण्याची योजना आखली. पोलिसांनी तिथे धाड टाकल्याचे कळताच अतुल तेथून फरार झाला. रेव्ह पार्टीत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्कासह सदस्यांचे येणे निश्‍चित करणे हे सर्व ऑनलाईन करण्यात आले होते.