-
पोलिसांच्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू नाही !
-
‘सीसीटीव्ही’तून उलगडले सत्य; तणाव निर्माण करणार्यांवर होणार कारवाई
संभाजीनगर – येथील पीरबाजारातील केशकर्तनालयाचे मालक फिरोज खान कदीर खान (वय ५० वर्षे) यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झालेला नाही, असे ‘सीसीटीव्ही’च्या चित्रणाच्या आधारे केलेल्या अन्वेषणात निष्पन्न झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे फिरोज यांना चक्कर आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे संबंधित पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी निर्दोष आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी पत्रकारांना दिली.
पोलिसांच्या मारहाणीमुळे फिरोज यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून फिरोज खान यांच्या नातेवाइकांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मृतदेहासह ठिय्या आंदोलन केले होते, तसेच संबंधित पोलीस अधिकार्यांना निलंबित करत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती; मात्र आता सत्य समोर आले आहे.
दीपक गिर्हे पुढे म्हणाले की, फिरोज यांना ‘हेड इंज्युरी’ असल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे; परंतु त्यासमवेतच बायपास शस्त्रक्रिया झालेल्या रक्तवाहिनीतील रक्तपुरवठा गोठल्याचेही आधुनिक वैद्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना चक्कर आली आणि ते थेट तेथील शटरच्या कुलपावर कोसळल्याने डोक्याला गंभीर इजा झाली. १५ एप्रिल या दिवशी ८ प्रत्यक्षदर्शींचा जबाबही नोंदवला गेला आहे.
ते म्हणाले की, १४ एप्रिल या दिवशी जमाव संतप्त झाला होता. अपसमज दूर करून त्यांना शांत करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे तांत्रिक अन्वेषण आणि ‘सीसीटीव्ही’ चित्रण हस्तगत करून सत्य समोर आणायला वेळ लागला; परंतु त्याचा अपलाभ घेत काही समाजकंटकांनी पोलिसांच्या मारहाणीतच मृत्यू झाल्याची अफवा पसरवत जमावाला चिथावणी दिली. अशा समाजकंटक आणि चिथावणी देणार्यांचा शोध चालू असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.