अवकाळी पावसाचा सहस्रो शेतकर्‍यांना फटका !

३२३ हेक्‍टरवरील पिकांची हानी

सातारा – कोरोनाशी दोन हात करतांना या वर्षी सहस्रो शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे झालेल्‍या हानीचा मोठा फटका बसला आहे. नुकत्‍याच झालेल्‍या अवकाळी पावसातील गारपीटीमुळे कोरेगाव, पाटण, माण आणि खटाव या तालुक्‍यांतील ३२३.३६ हेक्‍टरवरील बागायती क्षेत्र आणि फळपिके यांची हानी झाली आहे.

जिल्‍ह्यातील ४ तालुक्‍यांतील टोमॅटो, वांगी, कांदा, भाजीपाला, मका, झेंडू, पपई, घेवडा, हरभरा, बाजरी, मिरची, भोपळा, तसेच आंबा, चिकू, कलिंगड आदी फळांचीही हानी झाली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतात आणि रस्‍त्‍यांवर गारांचा खच पडला होता. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्‍याची भावना शेतकर्‍यांच्‍या मनात आहे. तालुक्‍यातील सर्वच शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून शासनाकडून आपत्‍कालीन परिस्‍थितीमध्‍ये भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.