(म्हणे) ‘रुग्णांना सांगा, घरी जा अन्यथा मेलात, तर आमचे दायित्व नाही !’

नरसिंहपूर (मध्यप्रदेश) येथील जिल्हा रुग्णालयात बरे झाल्यानंतर घरी न जाणार्‍या रुग्णांविषयी जनकल्याण मंत्री गोपाल भार्गव यांचा डॉक्टरांना जनताद्रोही सल्ला !

भाजपच्या सरकारमधील मंत्र्यांकडून असे विधान करण्याची राष्ट्रप्रेमींना अपेक्षा नव्हती ! जर रुग्ण घरी जाण्यास सिद्ध नसतील, तर त्यांची अडचण समजून त्यांना आधार देण्याचे दायित्व मंत्र्यांचे असतांना त्यांनी अशा प्रकारची विधाने करणे लोकशाहीच्या विरुद्ध आहे, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले पाहिजे !

नरसिंहपूर (मध्यप्रदेश) – येथील जिल्हा रुग्णालयामध्ये जनकल्याण मंत्री गोपाल भार्गव आढावा घेण्यासाठी गेले होते. तेव्हा डॉक्टरांनी कोरोना रुग्णांसंबंधित समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. डॉक्टरांनी सांगितले, ‘कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक रुग्ण घरी जाऊ इच्छित नाहीत. रुग्ण अधिक असल्याने ऑक्सिजन पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे.’ त्यानंतर गोपाल भार्गव यांनी डॉक्टरांना, ‘रुग्णांना सांगा, घरी जा अन्यथा मेलात, तर आमचे दायित्व नाही’, असे सांगण्यास सांगितले. तसेच त्यांनी डॉक्टरांना सांगितले, ‘रुग्णांना सेवा देणे बंद करा.’ याविषयीचा व्हिडिओच सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

या समस्येवर संबंधित डॉक्टरांनी सांगितले की, सर्व जिल्ह्यांतील रुग्ण येथे आहेत. कुणालाही अडवू शकत नाही; कारण हे सरकारी रुग्णालय आहे. जे रुग्ण कोरोनातून बरे झाले ते घरी जात नाहीत. ज्यांची ऑक्सिजन पातळी ९६-९८ आहे तेदेखील येथेच रहात आहेत.

२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांतील केवळ १ रुग्ण घरी गेला. जर बरे झालेले रुग्ण रुग्णालयामध्येच रहात असतील, तर गंभीर रुग्णांना कुठे ठेवायचे ? ‘घरात ऑक्सिजन पातळी अल्प होईल’ या भीतीने रुग्ण घरी जायला सिद्ध नाहीत.