गरीब, कष्टकरी अशा ४ सहस्र लोकांना प्रत्येक दिवशी शिवभोजनाचा आधार !

कोल्हापूर, १३ एप्रिल (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिन ३ सहस्र ९३३ लोकांची शिवभोजन योजनेद्वारे क्षुधातृप्ती करण्यात येत आहे. केवळ ५ रुपयांत देण्यात येणारे हे भोजन कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ‘पार्सल’ सेवेद्वारे पुरवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ३७ ठिकाणी हे भोजन वितरित करण्यात येते. ग्राहकांना हे भोजन ५ रुपयांत पडत असले, तरी प्रत्येक शिवभोजनामागे केंद्र चालवणार्‍यास सरकार ४५ रुपये देते. त्यामुळे याचा मोठा भार सरकार उचलते. गतवर्षी २६ जानेवारी २०२० या दिवशी मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा प्रारंभ केला होता. प्रारंभी ही योजना केवळ १० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येत होती. याचा लाभ प्रामुख्याने गरीब, कष्टकरी, मजूर, हमाल, बेघर, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी यांना झाला होता. यानंतर कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर दळणवळण बंदीत लोकांना दिलासा मिळावा; म्हणून एप्रिल २०२० पासून ही योजना केवळ ५ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ५ रुपयांच्या तुलनेत याची गुणवत्ताही चांगली असल्याने याचा लाभ लाखो लाभार्थी घेत आहेत.