रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कठोर पावले उचलली जातील ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई
मुंबई – कोरोनाबाधित रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आता कठोर पावले उचलली जाणार आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी १२ एप्रिल या दिवशी प्रसिद्धमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. कोरोनाबाधित रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुंबई महापालिकेकडून कृती आराखडा सिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती सौ. किशोरी पेडणेकर यांनी दिली.
सौ. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘‘मुंबईत सद्यस्थितीत दिवसाला सरासरी १० सहस्र रुग्ण आढळून येतात. त्यांना खाट मिळवतांना रुग्णांच्या नातेवाइकांची दमछाक होत आहे. अनेकजण खाटा अडवून ठेवत आहेत. योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळत नाही. ते १९१६ वर ‘हेल्पलाईन’ क्रमांकावर संपर्क करतात; मात्र अनेकांना दूरभाष व्यस्त लागतो. त्यामुळे मुंबईकरांनी प्रत्येक प्रभागातील ‘वॉररूम’मध्येच संपर्क करावा. ‘वॉररूम’मधील अधिकारी आणि नोडल अधिकारी बेड मिळवून देण्यासाठी साहाय्य करतील. आता प्रत्येक प्रभागासाठी २ नोडल अधिकारी असतील. हे अधिकारी दुपारी ३ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत काम पहाणार आहेत.’’ (सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत आवश्यकता भासल्यास नागरिकांनी कुणाला संपर्क करायचा ? – संपादक)
कोरोनाचा अहवाल २४ घंट्यांमध्ये देण्याची सूचना महानगरपालिकेकडून प्रयोगशाळांना देण्यात आली आहे. त्यामुळे त्वरित औषधोपचार करता येतील, तसेच पुढील उपचारासाठी कुठे पाठवायचे, याचाही निर्णय घेणे सोयीचे होईल, असे या वेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
हॉटेल्समध्ये ‘कोविड केअर सेंटर’प्रमाणे प्रशिक्षित डॉक्टर आणि अन्य सुविधा असतील. ज्या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारली असूनही त्यांनी खाटा अडवून ठेवलेल्या आहेत, अशा रुग्णांची व्यवस्था हॉटेल्समध्ये केली जाईल. ज्यांना जिथे रहाणे परवडेल, त्यांनीच तेथे रहावे, अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. खाटा अडवून ठेवल्यामुळे गरज असलेल्या रुग्णांना खाटा उपलब्ध होत नाहीत, असे या वेळी सौ. पेडणेकर म्हणाल्या.
येत्या ७ दिवसांत १ सहस्र १०० अतिरिक्त ‘कोविड केअर सेंटर’ चालू करण्यात येणार आहेत. यांतील ३२५ ठिकाणी अतीदक्षतागृहाची सुविधा असणार आहे. यामुळे मुंबईमध्ये एकूण अतीदक्षता विभागातील खाटांची संख्या २ सहस्र ४६६ एवढी होईल, असे त्या म्हणाल्या.