१४ एप्रिलच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री दळणवळण बंदीची घोषणा करण्याची शक्यता ! – राजेश टोपे

राजेश टोपे

मुंबई – १४ एप्रिल या दिवशी होणार्‍या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दळणवळण बंदीची घोषणा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘टास्क फोर्स’च्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. राज्यात दळणवळण बंदी कडक करण्याविषयीचे धोरण निश्‍चित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी १२ एप्रिल या दिवशी सकाळी ११ वाजता ही ‘ऑनलाईन’ बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि ‘टास्क फोर्स’चे सदस्य उपस्थित होते.

राजेश टोपे म्हणाले, ‘‘मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री अर्थ विभागासह अन्य महत्त्वाच्या विभागातील अधिकार्‍यांशी चर्चा करतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील. बैठकीत दळणवळण बंदीविषयी सखोल चर्चा करण्यात आली. ‘टास्क फोर्स’मधील तज्ञांनी दळणवळण बंदी लागू करावी’, असे मत मांडले आहे. राज्यातील संसर्गाची साखळी तोडणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी दळणवळण बंदी हा एकमेव पर्याय आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले.’’

‘टास्क फोर्स’च्या बैठकीत झालेली चर्चा !

१. राज्यात ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी ऑक्सिजन निर्मिती करण्याविषयी चर्चा झाली. ‘ही सुविधा खर्चिक असली, तरी तिचा प्रयोग करू’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

२. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी विद्युत शवदाहिनी उभारण्याविषयी चर्चा झाली.

३. ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा असल्यामुळे ते १५ दिवस काळजीपूर्वक वापरले पाहिजे. ‘रेमडेसिवीर’चा अनावश्यक वापर करणार्‍यांवर कारवाई करणे, ‘रेमडेसिवीर’ शासकीय रुग्णालयाला थेट आस्थापनाकडूनच दिले जाईल आणि त्याचे मूल्यही निर्धारीत असावे, याविषयी चर्चा झाली.

४. दळणवळण बंदीविषयी सर्वसमावेशक नियमावली सिद्ध करण्याविषयी चर्चा झाली.