महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक बंदीवान !

  • २ सहस्र ९७८ बंदीवान कोरोनाबाधित !   

  • कोरोनाबाधित ७ बंदीवानांचा मृत्यू !

सर्वत्रच्या कारागृह प्रशासनाला याविषयी काय म्हणायचे आहे ?

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत एकीकडे संक्रमित रुग्ण वाढत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील एकूण कारागृहामध्ये कोरोनाबाधित बंदीवानांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यातील ९ मध्यवर्ती कारागृहे, तर ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे, १ खुली वसाहत आणि १७२ दुय्यम कारागृहे यांचा समावेश आहे. या कारागृहांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक २ सहस्र ९७८ बंदीवानांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ७ बंदीवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील सर्व कारागृहांत २३ सहस्र २१७ बंदीवानांची क्षमता असतांना तेथे ३४ सहस्र ३२० बंदीवानांना ठेवण्यात आले आहे.

कोरोनामुळे ८ कारागृह कर्मचार्‍यांचा मृत्यू !

राज्यातील एकूण ४७ कारागृहांमध्ये आतापर्यंत ५६ सहस्र २२१ बंदीवानांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. यातील आतापर्यंत २ सहस्र ९७८ बंदीवान कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. उपचार घेऊन आतापर्यंत २ सहस्र ७८५ बंदीवान बरे झाले आहेत.

राज्यातील ४७ कारागृहांत असलेल्या ३ सहस्र ८१४ कारागृह कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ६७९ कारागृह कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले आहेत, तर आतापर्यंत कोरोनामुळे ८ कारागृह कर्मचार्‍यांचा मृत्यू झालेला आहे.