बंगालमध्ये आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या बिहारच्या पोलीस अधिकार्‍याची जमावाकडून हत्या !

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा आधीच उडालेले आहेत; मात्र याकडे सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याने, तसेच केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट न लावल्याने एका पोलीस अधिकार्‍यांची हत्या झाली, हे राजकीय पक्षांना लज्जास्पद !

नवी देहली – बिहारच्या किशनगंज नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अश्‍विनी कुमार हे एका लुटमारीच्या प्रकरणात आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथकासह बंगालला गेले होते. या वेळी दिनाजपूर जिल्ह्यातील पांजीपाडा पोलीस हद्दीतील पनतापाडा गावात जमावाने आरोपीला वाचवण्यासाठी अश्‍विनी कुमार यांच्या पथकावर आक्रमण केले. यात अन्य पोलीस पळण्यात यशस्वी झाले, तर अश्‍विनी कुमार जमावाच्या हाती लागले. त्यानंतर त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांचा गळा आवळण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.

( सौजन्य : अमर उजाला )

१. बिहारचे पोलीस महासंचालक यांनी सांगितले की, या घटनेच्या प्रकरणी बंगालच्या पोलीस महासंचालकांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी घडलेल्या प्रकरणाविषयी दुःख व्यक्त केले असून हुतात्मा पोलीस अधिकार्‍याच्या कुटुंबियांनी साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

२. बिहार पोलीस असोसिएशनचे अध्यक्ष मृत्युंजयकुमार सिंह यांनी अश्‍विनी कुमार यांच्या कुटुंबियांना राज्य आणि केंद्र सरकारांकडून प्रत्येकी १ कोटी रुपये हानीभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.