वाझे प्रकरणात माझा काडीचाही संबंध नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री 

अजित पवार, उपमुख्यमंत्री

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ८ एप्रिल – सचिन वाझे प्रकरणात माझा काडीचाही संबंध नसतांना माझे नाव घेतले जात आहे. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे का ?, याविषयी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर दौर्‍यावर आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींकडून वारंवार कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपुरातील एका कार्यक्रमात कोरोनाचे नियम पुन्हा धाब्यावर बसवण्यात आल्याचे दिसून आले. या सभेतील नेते आणि पदाधिकारी यांच्या तोंडाला मास्क नसल्याचे आढळले. एकीकडे गर्दी होत असल्याने दुकाने आणि अत्यावश्यक सेवा सोडून सर्वकाही बंद करण्यात आले असतांना नेत्यांच्या सभेत गर्दी होतांना कोरोना पसरत नाही का ?, असा प्रश्‍न व्यापार्‍यांनी उपस्थित केला.