यजमानांपासून दूर राहिल्यावर साधिकेला मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर झालेले लाभ

‘मी आणि माझे पती यांची एका संतांशी भेट झाली. त्यांनी आमच्या दोघांकडे बघून ‘चांगले वाटते’, असे सांगितले आणि हसून विचारले, ‘‘तुम्ही वेगळे रहात असल्यामुळे चांगले वाटत आहे का ?’’ त्यावर मी ‘हो’ म्हणून सांगितले. त्यानंतर त्यांनी याविषयी लिहून देण्यास सांगितले.

मी ३ वर्षांपूर्वी गोव्याला स्थलांतरित झाले. तेव्हा माझे यजमान नोकरीच्या निमित्ताने बेंगळुरू येथे रहात होते. त्या वेळी माझ्यासाठी त्यांच्याविना रहाणे कठीण होते; पण देवाच्या कृपेने ३ वर्षे कधी गेली, ते मला समजलेच नाही. या दिवसांमध्ये मला ‘यजमानांच्या जवळ होते, ते बरे होते’, असा विचार कधीही आला नाही. देवानेच त्याची जाणीव होऊ दिली नाही. त्यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. आमच्या वेगळ्या रहाण्याने माझ्यात झालेले पालट येथे दिले आहेत.

सौ. सुप्रिया पाटील

१. मानसिक स्तरावर झालेले लाभ

१ अ. एकमेकांवर अवलंबून रहाण्याचा भाग अल्प होऊन स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण वापर होणे : आम्ही वेगळे राहिल्याने आमचा एकमेकांवर अवलंबून रहाण्याचा भाग अल्प झाला. आम्ही दोघेही स्वतःची क्षमता पूर्णपणे वापरू लागलो. त्यामुळे स्वतःच्या कोशातून बाहेर यायला साहाय्य झाले.

१ आ. इतरांचे साहाय्य घेऊ लागल्याने अहं अल्प होणे : साधक आणि इतरांचे साहाय्य घ्यावे लागल्याने माझा अहं अल्प होण्यास साहाय्य झाले. साधनेच्या दृष्टीने झुकणे आणि इतरांशी जुळवून घेणे शिकायला मिळाले. त्यातून साधकांशी जवळीक साधायला आणि व्यापक व्हायला साहाय्य झाले. आपल्या सोयीने रहाण्याचा भाग (Comfort Zone) अल्प होतो. परिणामी इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता वाढायला लागली.

१ इ. अपेक्षा अल्प होणे : यजमानांनी ‘त्यांनी त्यांचा वेळ कसा वापरावा ? त्यांचे राहणीमान कसे असावे ? त्यांनी साधना करावी कि नाही ?’, या गोष्टींमध्ये माझ्या मनाचा असलेला सहभाग अल्प झाला. त्यामुळे ‘त्यांनी माझे ऐकावे, माझे मत विचारावे’, अशा अपेक्षा अल्प झाल्या. यजमानांच्या निर्णयांच्या संदर्भात ‘देव त्यांना साहाय्य करील’, हा भाग वाढला. त्यामुळे आमची भांडणे अल्प झाली. दूर राहिल्याने प्रत्येक वेळी त्यांना साहाय्य करणे शक्य नसते. याउलट ‘त्यांना आध्यात्मिक स्तरावर कसे साहाय्य करू शकतो ?’, हा भाग वाढला.

१ ई. जोडीदाराचे महत्त्व लक्षात येऊन त्याच्याकडे साधक म्हणून पहाण्याचा भाग वाढणे : दूर राहिल्याने जोडीदाराच्या अनुपस्थितीत त्याचे महत्त्व कळले. त्यांच्याकडे ‘नवरा’ म्हणून बघण्याचा भाग अल्प झाला आहे. त्यामुळे आता ‘यजमानांच्या रूपात देवाने मला साधक दिला आहे. माझा त्यांच्यावर हक्क नाही’, असा विचार असतो आणि ‘त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे’, असे मला वाटू लागले आहे. आम्ही अल्प वेळासाठी एकत्र येत असल्याने नाते पहाण्यापेक्षा एकमेकांना साहाय्य करण्याचा आणि समोरील व्यक्तीचा विचार करण्याचा भाग वाढला. ‘देव समर्थ आहे. तो बघून घेईल’, असा विचार वाढून नात्यातून अलिप्त रहाणे जमू लागले. त्यांच्याकडे ‘साधक’ म्हणून बघायला जमू लागले.

१ उ. समाजात वावरण्याचा आत्मविश्‍वास वाढणे : मला एकटीला सगळ्या गोष्टी कराव्या लागत असल्याने माझा समाजात वावरण्याचा आत्मविश्‍वास वाढला. तिथेही देवाचे साहाय्य अनुभवता आले. साधक म्हणून आपण समाजातील लोकांकडेही त्याच दृष्टीने बघतो; पण ‘आजच्या काळात आपण समाजात वावरतांना कशी काळजी घ्यायची ?’, हे शिकता आले. समाजात वावरतांना ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे आणि किती लवकर व्हायला हवी ?’, हे कळले. तसेच ‘समाजातील स्थितीला कारणीभूत असलेले स्वभावदोष माझ्यात किती आहेत आणि ते घालवले नाही, तर मीही पुढे अशीच होणार’, हे लक्षात आले.

२. आध्यात्मिक स्तरावर झालेले लाभ

२ अ. शिकण्याचा भाग वाढणे : अल्प वेळ एकत्र असल्याने एकमेकांचे साधनेचे प्रयत्न कळू लागतात. ‘समोरचा माझ्यापेक्षा जास्त प्रयत्न करत आहे’, असे वाटून त्याच्याकडून शिकणे आणि साधनेसाठी प्रयत्न करणे यांत वाढ होते.

२ आ. प्रसंगाकडे साधना म्हणून पहाता येणे : काही वेळा एकत्र रहाण्याची वेळ येते, तेव्हा त्या वेळी ‘केवळ देवाण-घेवाण फेडण्यासाठी एकत्र आलो आहोत’, याची जाणीव सतत रहाते. त्यामुळे ते सहजतेने स्वीकारले जाऊन ‘प्रत्येक प्रसंगाकडे साधना म्हणून बघता येते आणि जुळवून घेणे, पडते घेणे, मनाविरुद्ध वागणे अन् त्यातून साधना होते का, ते पहाणे’, असे प्रयत्न होतात. देवाने ‘भोग संपवण्यासाठी हे सर्व निर्माण केले आहे’, असे वाटून भोगण्याची क्षमता निर्माण केली आणि ‘कठीण परिस्थितीत देव साहाय्य करतो’, हे अनुभवता आले.

२ इ. पती आश्रमात राहिल्याने त्यांच्यातील गुण वाढणे : पती आश्रमात रहात असल्याने आणि त्यांना संतांचा सहवास मिळत असल्याने त्यांना बाहेरील वातावरणाचा त्रास झाला नाही. ‘त्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला’, असे मला वाटते. आश्रमात रहावे लागल्याने पतींमध्ये नीटनेटकेपणा, नियमांचे पालन करणे, स्वयंशिस्त आदी गुण आपोआप आले. एखाद्या जिवाचे प्रारब्ध पुष्कळ कठीण असेल; पण साधना करणार्‍या जिवांसाठी देवाने ते सुसह्य केले आहे. आमच्या प्रारब्धानुसार जी परिस्थिती आहे, त्यात देवाने आम्हा दोघांनाही भिन्न ठिकाणी ठेवून त्या परिस्थितीचा आम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर लाभ करून दिला. त्यातून शिकून आमच्याकडून साधना करवून घेतली.

२ ई. अहं अल्प होणे : एरव्ही केवळ ‘अपेक्षा, माझेच योग्य, माझा अहं जपला गेला पाहिजे’; म्हणून प्रयत्न व्हायचे. ‘मला समजून घ्यायला हवे आणि माझ्यासाठी जोडीदाराने सतत काहीतरी करत रहावे’, असे वाटायचे. त्यामुळे माझे मन समाधानी नव्हते. स्वतःचे वर्चस्व वाढवण्यासाठी सतत प्रयत्न असायचे. मी निराळी राहिल्यामुळे ‘जोडीदाराला समजून घेते, साहाय्य करते’, हा अहं गळून पडण्यास साहाय्य झाले.

२ उ. जोडीदाराच्या नात्यापेक्षा देवाशी जोडले गेलेले नाते आवडू लागणे : देव मला साहाय्य करून माझी क्षमता वाढवतो, हे अनुभवता येते. त्यातून देवाप्रती भाव वाढायला साहाय्य होते. परिस्थिती स्वीकारता येते आणि जमत नसेल, तर देवाला शरण जाते. त्यातूनच देवाच्या जवळ जाण्यास साहाय्य होते. ‘जोडीदारापेक्षा देव मोठा आहे. तो कधीही आणि कुठेही आपल्या साहाय्याला येऊ शकतो’, याचा मनावर संस्कार होऊ लागल्याने देवाशी जवळीक वाढली. नात्यातील बंधनापेक्षा देवाशी जोडले गेलेले नाते चांगले वाटून आवडू लागले.

२ ऊ. देवाविषयीचा भाव वाढून अन्य नात्यांमध्येही अलिप्तता येणे : पती-पत्नीच्या नात्यांप्रमाणे अन्य नात्यांचेही असेच आहे. त्यामुळे त्या नात्यांतूनही अलिप्तता येऊ लागते आणि साधनेला वेळ देण्याचा भाग वाढतो. इतर नात्यांतील प्रसंगही अल्प होऊ लागतात आणि प्रसंग घडले, तरी त्यात अडकण्याचा भाग होत नाही. या सर्व प्रक्रियेतून देव अलगदपणे नात्यांची दोर कापतो आणि ती स्वत:ला जोडून घेतो. ‘देव आपल्याला स्वीकारून आपले सर्व दायित्व घेतो’, हे अनुभवायला मिळाले. त्यातून ‘भगवंताविना कुणी नाही आणि कधीही नाही’, असे वाटून भाव वाढतो. ‘देवच माझे सर्वस्व आहे’, हे मनापासून अनुभवता येते. त्यामुळे मी ‘देवासाठी किती करू आणि कितीही केले, तरी ते अल्पच आहे’, ही भावना वाढीस लागते. या जन्माचे कर्म करणे, भोग भोगत देवाकडे जाणे आणि त्याची प्राप्ती करून घेणे, हे एकच ध्येय मनात उरते.

२ ए. आसक्ती अल्प होणे : या सर्व प्रक्रियेमुळे मायेतील गोष्टींची आसक्ती अल्प होऊ लागते. त्या विषयांना बाजूला सारून साधनेच्या दृष्टीने प्रयत्न करता येतात आणि विशेष म्हणजे ‘ही सर्व प्रक्रिया करून घेणारा भगवंत आहे. तोच त्याच्या प्राप्तीचे, ध्येयपूर्तीचे प्रयत्न करवून घेत आहे. तोच प्रसंग निर्माण करतो आणि त्यावर मात करायला शिकवतो’, हे सर्व आपण अलिप्तपणे बघू आणि अनुभवू शकतो. त्यामुळे कर्तेपणाही वाढत नाही. वाढला, तरी देव प्रसंग घडवून ते लक्षात आणून देतो. कधी जोडीदाराच्याही अपेक्षा वाढतात आणि आपल्याला जाणीव होते, ‘मायेतल्या नात्यांपेक्षा देवाशी असलेले नातेच बरे !’

३. सर्व काही तुम्ही, तुम्ही आणि तुम्हीच ।

परात्पर गुरु डॉक्टर, परिस्थिती निर्माण करणारे तुम्हीच ।
त्यातून तारून नेणारेही तुम्हीच ।
त्यातून आम्हाला घडवणारेही तुम्हीच ॥ १ ॥

कसे घडलो, हे लिखाणातून उलगडवणारेही तुम्हीच ।
सर्व काही तुम्ही, तुम्ही आणि तुम्हीच ॥ २ ॥

आमचा श्‍वास तुम्हीच, आमचा ध्यास तुम्हीच ।
आमचे मन तुम्हीच, आमचे धन तुम्हीच ।
आमचे गुण तुम्हीच, आमची साधनाही तुम्हीच ॥ ३ ॥

आमचे नाते तुम्हीच, आमचा संसारही तुम्हीच ।
आमचे हरणे (टीप १) तुम्हीच ।
आमच्या हरण्यात जिंकणेही (टीप २) तुम्हीच ॥ ४ ॥

आमचे हास्य तुम्हीच, आमचे रडणेही (टीप ३) तुम्हीच ।
आमचे जीवन तुम्हीच, आमचे मरणही (टीप ४) तुम्हीच ।
आमची लढाई (टीप ५) तुम्ही, आमचे जिंकणे तुम्हीच ॥ ५ ॥

आमची चेतनाही तुम्हीच, आमचे प्राणही तुम्हीच ।
आमचा मोक्ष तुम्हीच, आमचे असे काहीच नाही ।
सर्वकाही तुम्हीच तुम्ही, तुम्हीच ॥ ६ ॥

(प.पू. गुरुदेव, ही कविता सुचवणारेही तुम्हीच)

टीप १ – परिस्थिती किंवा दोषांमुळे हरतो, ते हरणे
टीप २ – हरल्यावर शरण जाऊन त्याला सामोरे जातो.
टीप ३ – त्यांच्या आठवणीने रडू येते.
टीप ४ – अहं अल्प होणे
टीप ५- ईश्‍वरप्राप्तीसाठी दोषांवर मात करणे

– सौ. सुप्रिया पाटील, गोवा. (७.१०.२०१९)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक