लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन दिल्याने ती होत आहेत चिडखोर ! – अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे सर्वेक्षण

विज्ञानाचा असाही एक दुष्परिणाम !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – दोन ते तीन वर्षांच्या मुलांच्या हातात स्मार्टफोन देणे धोकादायक ठरत आहे; कारण भ्रमणभाषमुळे मुले आणखी चिडखोर होत असल्याचे अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका सर्वेक्षणामधून समोर आले आहे.

१. या सर्वेक्षणामध्ये स्मार्टफोनवर कार्टून पहाणार्‍या लहान मुलांच्या वर्तनाचा, तसेच पालक किती वेळ मुलांना स्मार्टफोन वापरायला देतात, याचा अभ्यास करण्यात आला.

२. मुलांना भ्रमणभाष दिल्यानंतर आधी ती शांत झाली; मात्र थोड्या वेळाने तो काढून घेतल्यानंतर त्यांच्या रागाचा पारा चढला. असे वारंवार झाल्यास मुले अधिक रागीट आणि हिंसक बनतात, असे या अभ्यासात आढळले.

३. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी रागावर नियंत्रण आणता येण्यासाठी पालकांनी मुलांना भ्रमणभाषपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी पालकांनाही या अहवालातून काही सूचना देण्यात आल्या आहेत.

हे करणे टाळा !

१. लहान मुलांना भ्रमणभाषवर ऑडिओ किंवा व्हिडिओ ऐकवणे अथवा दाखवणे टाळा.

२. १८ मासांपेक्षा अल्प वयाच्या मुलांना भ्रमणभाष देऊ नका.

३. २ ते ५ वर्षांच्या मुलांना दिवसभरात एक घंट्याहून अधिक काळ भ्रमणभाष वापरायला देऊ नका.

४. मुले कोणते व्हिडिओ पहातात, यावर पालकांनी लक्ष ठेवायला हवे.

५. जेवतांना वा प्रवास करतांना मुलांना व्हिडिओ दाखवणे टाळा.