पाकव्याप्त काश्मीरवर पुन्हा नियंत्रण मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र करणे, हे आता विसरून जा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार्‍या युद्धाभ्यासामुळे डॉ. स्वामी अप्रसन्न !

याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करून भारतियांना आश्‍वस्त करणे आवश्यक !

नवी देहली – पाकव्याप्त काश्मीरवर पुन्हा नियंत्रण मिळवणे आणि बलुचिस्तानला पाकपासून स्वतंत्र करणे, हे आता विसरून जा, असे उत्तर भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी एका प्रश्‍नावर ट्वीट करून दिले आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने एका बातमीचा हवाला देत डॉ. स्वामी यांना टॅग करत ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का ?’, अशी विचारणा केली होती. त्यावर डॉ. स्वामी यांनी वरील उत्तर दिले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार्‍या युद्धाभ्यासावर डॉ. स्वामी अप्रसन्न असल्याचे सांगितले जात आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून तो पुन्हा मिळवण्याकरता प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात होते. कलम ३७० हटवल्यानंतर भारत त्या दिशेने कृती करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती.

काही दिवसांपूर्वी डॉ. स्वामी यांनी ट्वीट करत, चीन आणि पाकिस्तान यांच्याविषयीच्या धोरणांमुळे नेपाळ, भूतान आणि श्रीलंका यांसारखे मित्र गमावण्याची वेळ आली आहे, असा आरोप केला होता.