नांदेड येथे शीख समाजाच्या धार्मिक मिरवणुकीत पोलिसांवर तलवारीने आक्रमण !

  • १४ पोलीस घायाळ

  • पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड

पोलिसांवर वारंवार होणारी आक्रमणे राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने चिंताजनक !

नांदेड – येथे शीख समाजाच्या वतीने २९ मार्च या दिवशी काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ या धार्मिक मिरवणुकीला आडकाठी करणार्‍या पोलिसांवर जमावाने तलवारीने आक्रमण केले. या आक्रमणात १४ पोलीस घायाळ झाले. यांमधील ४ पोलिसांची स्थिती गंभीर आहे. आक्रमणात पोलीस अधीक्षकांच्या वाहनासह ७ गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी २० जणांना अटक करण्यात आली.

शीख समाजाच्या वतीने होळीनंतर प्रतिवर्षी येथील गुरुद्वाराच्या येथून हल्लाबोलची मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीमध्ये पूजाअर्चा करण्यासाठी अनुमती देण्यात आली होती; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी मिरवणुकीला अनुमती नाकारली होती. शीख समाजातील मान्यवरांनीही त्यानुसार धार्मिक कार्यक्रम करण्याचेही मान्य केले होते. प्रत्यक्षात मात्र सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रमाला प्रारंभ झाल्यावर गुरुद्वारजवळ मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहिले. त्यांतील काही युवकांनी प्रतिवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून मिरवणूक थांबवण्याचा प्रयत्न केल्यामुळे संतप्त जमावाने पोलिसांवर आक्रमण केले. यामध्ये पोलीस अधीक्षकांचे २ अंगरक्षकही घायाळ झाले आहेत.

गुरुद्वाराच्या परिसरात लावलेले सर्व ‘बॅरिकेट्स’ही जमावाने तोडून टाकले. सद्यःस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आली आहे; परंतु परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे.