‘युद्धस्थ कथा रमस्य ।’, असे म्हटले जाते. प्रत्येकाला ‘अभिमन्यू आपल्या नको, तर दुसर्यांच्या घरात जन्माला यावा’, असे वाटत असते. छत्रपती शिवाजी महाराज थोर योद्धे होऊन गेले. ते केवळ महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचेही मोठे नायक आहेत. त्यांनी त्या काळी अनेक महापराक्रम गाजवले. या पराक्रमाची गाथा लोकांपर्यंत पोचल्याने त्यांच्यात देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता वाढते. त्यासाठीच शिवजयंती सारखे उत्सव साजरे करावे लागतात. युद्धे आधीही होत होती आणि पुढेही होत रहातील; पण देशासाठी झिजणे हाच परमार्थ आहे. तसेच राष्ट्र-धर्म हाच खरा धर्म आहे. ‘महाराष्ट्र देशाचा एक खड्गहस्त व्हायला पाहिजे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते. ‘देश माझ्यासाठी काय करेल, यापेक्षा मी देशासाठी काय करू शकतो’, हे महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजींच्या काळात पातशाह्या आणि फितूर नागरिक हे शत्रू होते. आज चीन, पाकिस्तान, आतंकवादी, नक्षलवावादी आणि देशद्रोही असे शत्रू आहेत. यांवर विजय मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकला अन् कौशल्य यांचे विशेष महत्त्व आहे.
१. जन्मजात अनेक गुण लाभलेले छत्रपती शिवाजी महाराज युद्धासाठी आदर्श नेतृत्व !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोगल, आदिलशाही आणि कुुतुबशाही होती. त्या सर्वांचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी चांगला अभ्यास केला होता. युद्धासाठी अतिशय प्रतिभावंत नेतृत्वाची आवश्यकता असते. छत्रपतींचे नेतृत्व हे जन्मजात होते. अर्थात् त्यांना शहाजीराजे आणि दादाजी कोंडदेव यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले. त्यांनी स्वत:हून युद्धकलेचा पुष्कळ अभ्यास केला होता. त्यांनी त्यांच्या शत्रूचे पुष्कळ निरीक्षण केले होते. महाराजांकडे ती युद्धकला होती. त्यांनी त्यांच्याकडील अनेक चांगले गुण मावळ्यांमध्ये प्रक्षेपित केले होते. त्यांनी मावळ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांनाही प्रतिशिवाजी केले होते. आजही तशाच प्रकारच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे.
२. भारतीय सैन्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकलेचा वापर करणे
भारतीय सैन्यामध्ये महाराजांच्या युद्धकलेचा गहन अभ्यास करण्यात येतो. सैन्यामध्ये कॅप्टनपासून मेजरपदापर्यंत पोचण्यासाठी ‘पार्ट-बी’ ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. या परीक्षेला बसल्यावर ‘कॅरेक्टर स्टडी’ (चरित्र अभ्यास) म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास केला. त्यांच्यात धाडस, साहस, चिकाटी आदी नेतृत्वासाठी लागणारे अनेक गुण होते. ते सर्वांत पुढे राहून सैन्याचे नेतृत्व करायचे. हेच भारतीय सैन्य आज करत आहे.
वर्ष १९९९ च्या कारगिल युद्धाच्या वेळी टायगर हिलवर भारतीय सैन्याने पाकवर आक्रमण केले. त्या आक्रमणाची तुलना तानाजी मालुसरे यांनी कोंडाण्यावर केलेल्या आक्रमणाशी करता येईल. तानाजी मालुसरे आणि मावळे यांनी एका घोरपडीच्या साहाय्याने कोंडाणा किल्ला सर केला. त्याचप्रमाणे टायगर हिलवरही भारतीय सैन्याकडून चढाई करण्यात आली. कोंडाण्यावरचे म्हणजे सिंहगडावरचे आणि टायगर हिलवरील आक्रमण यांच्यात पुष्कळ साम्य होते.
३. छत्रपती शिवाजी महाराज आणि गनिमी कावा
अ. सह्याद्रीच्या परिसरात डोंगर, नदी आणि जंगले होती. सह्याद्रीचा हा परिसर गनिमी काव्यासाठी अतिशय अनुकूल होता. या भागातच महाराजांनी त्यांचे स्वराज्य निर्माण केले. मोगलांचे सैन्य प्रचंड मोठे होते. त्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज यांनी लहान युद्धे आणि गनिमी कावा यांचा वापर अतिशय उत्कृष्टपणे केला. गनिमी कावा एक युद्धतंत्र होते. ती अशी युद्धकला होती, त्यातून त्यांनी मोगल, आदिलशहा आणि कुतुबशाह यांच्यासारख्या मोठ्या शत्रूंनाही हरवले. गनिमी कावा म्हणजे शिवाजी महाराजांचे मावळे शत्रूंच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर दबा धरून बसायचे, शत्रूवर अचानक काही कळायच्या आत आक्रमण करायचे आणि त्वरित गायबही व्हायचे. त्यामुळे नेमके काय होत आहे, हे शत्रूला कधीच कळत नव्हते. आक्रमणे करणारे सैनिक हे त्या परिसरातच स्वत:ची गुजराण करायचे. त्यासाठी त्यांना आजूबाजूचे नागरिक साहाय्य करायचे. महाराष्ट्राची सामान्य जनता ही त्यांचे सर्वांत मोठे बळ आणि तेच त्यांच्या गनिमी काव्याचे सैनिकही होते. आजही देशाचे रक्षण करण्यासाठी सामान्य माणसांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
आ. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा भूमीसह समुद्रातही चालायचा. महाराज हे पहिले राजे होते की, ज्यांनी नौदल निर्माण केले होते. त्यांना ठाऊक होते की, आपण समुद्राकडे लक्ष दिले नाही, तर तेथून महाराष्ट्राला धोका निर्माण होऊ शकतो. त्यांनी समुद्रावरून दूरवर लक्ष ठेवता येण्यासाठी तेथे किल्ले उभारले. तेथून त्यांनी काही लहान लहान किल्ले खाड्यांच्या मुखावर बांधले होते. एखादे वेळी युरोपच्या लोकांचे आक्रमण झाले आणि त्यांच्याशी लढणे शक्य नसले, तर महाराजांची गलबते ही पळून खाड्यांच्या आत शिरायची आणि संधी मिळताच पुन्हा एकदा आक्रमण करायची.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे
छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले, म्हणजे स्वराज्याचे प्राण !
अ. छत्रपती शिवाजी महाराजांची रणभूमी ही सह्याद्रीच्या भागात होती. त्यांनी स्वराज्य हे पठारी भागात नाही, तर दुर्गम ठिकाणी निर्माण केले. त्यांनी सर्व किल्ले सह्याद्रीच्या भागात बांधले होते. त्यांचे किल्ले म्हणजे त्यांचे तळ होते. या किल्ल्यांचे भौगोलिक स्थान उत्कृष्ट होते. ते अशा ठिकाणी बांधले की, तेथे शत्रूला आक्रमण करण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागायचा. किल्ल्याच्या कडेकपारी अतिशय कठीण होत्या. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एकच रस्ता असायचा. त्यामुळे हे किल्ले जिंकणे अजिबात सोपे नव्हते; म्हणूनच शत्रूने काही लोकांना फितूर करून ते किल्ले जिंकण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना तटबंदी असायची. शत्रूंवर टेहळणी करण्यासाठी मनोरे आणि आजूबाजूला खंदक असायचे, तसेच आत बालेकिल्ला असायचा. किल्ल्यांच्या आजूबाजूने वेढा घालणे अतिशय कठीण होते. आ. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे त्यांच्या स्वराज्याचा प्राण होते. महाराजांंनी त्यांच्या किल्ल्यांचा वापर केवळ स्वत:साठी केला नव्हता. तेथे त्यांनी त्यांच्या लोकांच्या रहाण्याची व्यवस्था केली होती. शस्त्र ठेवणे आणि टेहळणी करणे यांसाठी जागा होत्या. तेथील व्यवस्थापन उत्तम होते. हे किल्ले परिपूर्ण होते. ‘अशाच प्रकारचा इतिहास आपण घडवू शकतो का ?’, हा विचार आता करायला हवा. |