इंडोनेशियामध्ये चर्चसमोरील आत्मघाती आक्रमणात काही जण ठार, तर १४ हून अधिक जण घायाळ

इंडोनेशियात आत्मघाती बॉम्बस्फोट

जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियातील मकस्सर शहरामधील एका कॅथोलिक चर्चसमोर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात काही जणांचा मृत्यू झाला आहे. या बॉम्बस्फोटाची तीव्रता इतकी होती की, मृतदेहांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. बॉम्बस्फोटानंतर घटनास्थळी मृतदेहांचे अवयव छिन्नविच्छिन्न पडले होते; मात्र हे अवयव बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या आतंकवाद्यांचे आहेत कि अन्य कुणाचे हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. या स्फोटात १४ हून अधिक जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. ‘बॉम्बस्फोटामागील कारणांचा शोध घेण्यासाठी आम्ही अन्वेषण चालू केले आहे’, अशी माहिती पोलीस आयुक्त ई. झुलपन यांनी दिली.

चर्चचे पाद्री विल्हेमुस तुलक यांनी सांगितले की, संशयित आतंकवादी दुचाकीवरून चर्चाच्या मैदानात घुसण्याचा प्रयत्न करत होते; मात्र त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवले. तेव्हा त्यांनी आत्मघाती स्फोट घडवून आणला.