अध्यात्मशास्त्राविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘संतांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’पदावरील संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यांच्या उजव्या आणि डाव्या पायाच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. १९.५.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ही चाचणी करण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
वाचकांना सूचना :जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या आणि डाव्या पायाच्या बोटांच्या नखांची (टीप) ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
टीप – बोटाचे नख हे बोटाचा भाग असल्याने बोटातून प्रक्षेपित होणारी स्पंदने नखातूनही प्रक्षेपित होतात. त्यामुळे या चाचणीत पायाच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची नखे उपयोगात आणली गेली.
१ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या आणि डाव्या पायाच्या बोटांच्या नखांमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळल्या नाहीत.
१ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या आणि डाव्या पायाच्या बोटांच्या नखांतून सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) प्रक्षेपित होणे
वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या पायाच्या बोटांच्या नखांच्या तुलनेत उजव्या पायाच्या बोटांच्या नखांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ थोडी अधिक होती.
२. त्यांच्या दोन्ही पायांच्या बोटांच्या नखांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळी अंगठा ते करंगळीपर्यंत उतरत्या क्रमाने होत्या.
३. त्यांच्या दोन्ही पायांच्या बोटांच्या नखांपैकी अंगठ्याच्या आणि त्यातही उजव्या अंगठ्याच्या नखाच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ सर्वाधिक होती.
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या पायाच्या बोटांच्या नखांच्या तुलनेत त्यांच्या उजव्या पायाच्या बोटांच्या नखांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अधिक असण्याचे कारण : मानवी शरिराच्या उजव्या भागावर सूर्य नाडीचा (पिंगला नाडीचा) आणि डाव्या भागावर चंद्र नाडीचा (इडा नाडीचा) प्रभाव असतो. सूर्यनाडी अग्नीतत्त्वाची, तर चंद्रनाडी आपतत्त्वाची निर्देशक आहे. त्यामुळे सूर्यनाडी तेजस्वी, तर चंद्रनाडी शीतल असते. सूर्यनाडी तेजस्वी असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या पायापेक्षा उजव्या पायामध्ये अधिक प्रमाणात शक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या डाव्या पायाच्या बोटांच्या नखांच्या तुलनेत उजव्या पायाच्या बोटांच्या नखांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अधिक असल्याचे चाचणीतून दिसून आले.
२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दोन्ही पायांच्या अन्य बोटांच्या तुलनेत अंगठ्याच्या नखांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अधिक असण्याचे कारण : मानवाच्या हातापायांची बोटे ही पंचतत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात. अंगठा – आकाशतत्त्व, तर्जनी – वायूतत्त्व, मध्यमा – अग्नीतत्त्व, अनामिका – आपतत्त्व आणि करंगळी – पृथ्वीतत्त्व यांचे प्रतिनिधित्व करतात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचतत्त्वे अनुक्रमे अधिकाधिक सूक्ष्म असल्याने ती अधिकाधिक प्रभावी (बलवान) आहेत. त्यामुळे पाचही बोटांपैकी अंगठ्यातून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दोन्ही पायांच्या अंगठ्याच्या नखांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अन्य बोटांच्या नखांच्या तुलनेत अधिक असल्याचे चाचणीतून दिसून आले.
वरील विवेचनातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या पायातून आणि त्यातही त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यातून सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) प्रक्षेपित होते, हे लक्षात येते.
२ इ. संतांच्या चरणांवर डोेके ठेवून नमस्कार केल्यामुळे होणारा आध्यात्मिक स्तरावरील लाभ : हिंदु धर्मात संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा व्यक्ती संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करते, तेव्हा तिला संतांच्या चरणांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करता येते. यातून हिंदु धर्मात प्रत्येक कृतीला अध्यात्मशास्त्रीय आधार आहे, हे लक्षात येते.
२ ई. संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करण्याची योग्य पद्धत
२ ई १. चरणांवर ठेवावयाचा डोक्याचा भाग : ‘ब्रह्मरंध्रातून सर्वांत जास्त प्रमाणात चैतन्य ग्रहण करता येते. ब्रह्मरंध्र संतांच्या चरणांवर ठेवता येत नाही; म्हणून कपाळ संपून डोेके जेथे सुरू होते, तो भाग संतांच्या चरणांवर ठेवावा. यामुळे संतांच्या चरणांतून बाहेर पडणारे चैतन्य अधिकाधिक ग्रहण करता येते.
२ ई २. चरणांवर डोके ठेवण्याचे योग्य स्थान : संतांच्या पावलांच्या अंगठ्यांतून सर्वांत अधिक प्रमाणात चैतन्य बाहेर पडत असते; म्हणून डोके पावलाच्या मध्यभागी न टेकवता अंगठ्यावर टेकवावे. डोके ठेवायला दोन्ही पायांचे अंगठे उपलब्ध असले, तर उजव्या पायाच्या अंगठ्यावर डोके ठेवावे.’
(संदर्भ – सनातनचा लघुग्रंथ ‘नमस्काराच्या योग्य पद्धती’)
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.५.२०१८)
ई-मेल : [email protected]
|