राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना प्रतिकूल काळही अनुकूल होऊन ‘प्रत्यक्ष भगवंतच कार्य करून घेतो’, याची आलेली प्रचीती !

श्री. आदित्य शास्त्री

१. ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वक्त्याला हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या एका सभेमध्ये २ सहस्र प्रेक्षकांसमोर अनपेक्षितपणे बोलण्याची संधी मिळाल्याने समितीचे नाव मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचणे अन् वर्तमानपत्रांनीही सभेला पुष्कळ प्रसिद्धी देणे

‘इचलकरंजी येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी प्रसार चालू केला. तेव्हा इचलकरंजी येथे हिंदु जनजागृती समितीला फारसे कुणी ओळखत नव्हते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करून प्रसार चालू केला. तेव्हा समितीच्या वक्त्याला एका अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या सभेत विविध वक्त्यांसमवेत ५ मिनिटे बोलण्याची संधी मिळाली; मात्र त्या ठिकाणी सर्व राजकारणी आणि वक्ते जमल्याने आयोजकांनी सर्वांचे बोलणे रहित करून केवळ समितीच्या वक्त्यालाच बोलायला सांगितले. त्यामुळे समितीचा वक्ता जवळपास २ सहस्र हिंदूंसमोर २५ मिनिटे बोलू शकला. समितीचे नाव इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचले. या सभेला वर्तमानपत्रांनीही पुष्कळ प्रसिद्धी दिली. त्यामुळे समितीचे नाव सर्वत्र पोचले. ‘समितीची फारशी ओळख नसलेल्या गावात अशा पद्धतीने अनपेक्षितपणे संधी मिळणे आणि प्रसार होणे’, हे केवळ गुरुदेवांच्या कृपेने शक्य झाले.

२. एका धर्मप्रेमीने इचलकरंजीतील एका राजकीय व्यक्तीची ओळख करून देणे आणि त्यांच्याकडून ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’साठी सर्व स्थानिक हिंदुत्वनिष्ठ व्यक्तींचे संपर्क मिळणे

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या मनात ‘इचलकरंजी येथील सभेसाठी विविध संपर्क कसे मिळतील ?’, असा विचार चालू होता. गुरुदेवांच्या कृपेने एका धर्मप्रेमीने तेथील एका राजकीय व्यक्तीची ओळख करून दिली. त्या व्यक्तीला समितीच्या कार्यकर्त्यांना भेटून पुष्कळ आनंद झाला. ते धर्मप्रेमी म्हणाले, ‘‘मी पुष्कळ दिवसांपासून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची वाट बघत होतो; कारण मी याआधी तुमच्या एका सभेत सेवा केली आहे; मात्र त्यानंतर तुम्ही या भागात फारसे न आल्याने मला नाईलाजाने राजकीय पक्षातून हिंदुत्वाचे कार्य करावे लागले. मी तुम्हाला सर्व सहकार्य करतो आणि येथील सर्व हिंदुत्वनिष्ठ व्यक्तींचे संपर्क तुम्हाला देतो. तुम्ही माझे नाव सांगून त्यांना संपर्क करू शकता.’’ देवाने त्या एका व्यक्तीच्या माध्यमातून सभेसाठी संपर्क मिळण्याची काळजी दूर केली.

३. ‘ट्विटर’वर हिंदू जागृत होऊन हिंदुत्वाच्या विषयावर धर्माच्या बाजूने जोरदार वैचारिक लढा देत असून ‘ट्विटर’ची वाटचाल ‘सेक्युलर  इंडिया’कडून ‘हिंदु राष्ट्रा’कडे (कलियुगांतर्गत सत्ययुग) होत असल्याची प्रचीती येणे

अनुमाने ४ वर्षांपूर्वी ‘ट्विटर’वर हिंदुविरोधी लिखाण आणि ‘ट्रेंड’ अधिक प्रमाणात चालत होते. त्यामुळे ‘हे माध्यम पाहिल्यावर आपण ‘सेक्युलर इंडिया’मध्ये आहोत’, असे वाटायचे. आता ‘ट्विटर’वर प्रतिदिन सकाळी देवनागरी लिपीमध्ये विविध हिंदु देवतांच्या नावाने ‘ट्रेंड’ चालू असतात, उदा. श्री गणेश, श्रीराम, श्रीकृष्ण, नमो नारायण इत्यादी. त्याचप्रमाणे पूर्वीच्या तुलनेत आता ट्विटरवर हिंदू जागृत होऊन हिंदुत्वाच्या विषयावर धर्माच्या बाजूने जोरदार वैचारिक लढा देतात. पूर्वी हे प्रमाण अतिशय अल्प होते. ट्विटरवर सातत्याने हिंदुत्वावर ‘ट्रेंड’ चालू असतात आणि हिंदू पूर्वीचा नेभळटपणा त्यागून हिंदुद्वेष्ट्यांना तोडीस तोड उत्तरे देतात. हा सर्व अद्भुत पालट पाहून ‘केवळ देवाच्या कृपेने ‘ट्विटर’वरील वैचारिक युद्धाचे पारडे हिंदूंच्या बाजूने झुकायला लागले आहे आणि ट्विटरची वाटचालही ‘सेक्युलर इंडिया’कडून ‘हिंदु राष्ट्रा’कडे (कलियुगांतर्गत सत्ययुग) होत आहे’, याची प्रचीती आली अन् माझी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

४. ‘फेसबूक’वर ‘हिंदु जनजागृती समिती’ला उदंड प्रतिसाद !

‘फेसबूक’ या सामाजिक माध्यमाच्या (सोशल मिडियाच्या) माध्यमातून पूर्वी समितीच्या स्थानिक ‘पेज’वरून साधारण २ लाख लोकांपर्यंत पोचले जात होते. आता दळणवळण बंदी आणि फेसबूकची तांत्रिक बंधने वाढली असूनही या माध्यमातून प्रती आठवड्याला ८ लाख, तर कधी कधी १३ लाख लोकांपर्यंत हिंदु धर्माचा विषय पोचत आहे. हा पालट केवळ देवाच्या कृपेने झाला आहे. यासाठी देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. आदित्य शास्त्री, कोल्हापूर (१७.९.२०२०)

कोल्हापूर सोडून इतर जिल्ह्यांतील साधकांनाही येथे दिल्याप्रमाणे अनुभूती येत असल्यास त्यांनीही त्या पाठवाव्यात – संकलक
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक