नवी देहली – वर्ष २०२२ च्या शेवटपर्यंत जग कोरोनाच्या महामारीतून पूर्णपणे मुक्त होईल आणि परत मूळ पदावर येईल, असे विधान मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केले आहे. पोलंडचे वृत्तपत्र गॅझेटा वायबोर्झा आणि ‘टीव्हीएन् २४’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.
१. गेट्स यांनी म्हटले की, कोरोना महामारी म्हणजे जगातील अविश्वसनीय शोकांतिका आहे. या काळात संपूर्ण जग देशोधडीला लागले. कोरोनाने सर्वसामान्यांच्या जीवनात शिरकाव केल्यापासून आतापर्यंत केवळ एकच गोष्ट चांगली घडली आहे, ती म्हणजे कोरोनाची लस आता उपलब्ध झाली आहे. या लसीमुळे लोक आता लवकरात लवकर कोरोनामुक्त होतील.
२. कोरोनाला दूर करण्यात भारताने केलेल्या प्रयत्नांचीही बिल गेट्स यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, वैज्ञानिक नवनिर्मितीत भारताने आणि भारताच्या नेतृत्वाने चांगला पुढाकार घेतला. कोरोना हा साथीचा रोग आटोक्यात आणण्यासाठी भारताने भरीव अशी कामगिरी केली, भारताने लवकरात लवकर केवळ लस निर्माण केली नाही, तर इतर देशांनाही त्याचा पुरवठा करून त्यांना आश्वस्त केले. ही फार मोठी गोष्ट आहे.