सांगली – आयर्विन पुलाला नियोजित समांतर पूल केल्यामुळे सांगलीची बाजारपेठ उद्ध्वस्त होईल, अशी भीती काही व्यापार्यांना घालून संपूर्ण सांगलीच्या विकासालाच स्थगिती देण्याचा उद्योग काही मंडळी करत आहेत. भाजप सरकार असतांना मी एक आमदार म्हणून आणि त्याही पेक्षा एक पिढीजात व्यापारी म्हणून सांगलीच्या बाजारपेठेचा विकास, सांगलीतील वाढलेली वाहतूक या गोष्टी लक्षात घेऊन आयर्विन पुलाला एक समांतर पूल आणि हरिपूर कोथळी पूल, असे २ पूल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् चंद्रकांत पाटील यांच्याकडून संमत करून घेतले. आज कोथळी पूल पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे; परंतु ‘मेनरोड’वरून होणारा पूल काही लोकांच्या राजकारणामुळे होऊ शकला नाही, असे प्रसिद्धीपत्रक भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिले आहे.
त्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, गेले एक मास आयर्विन पूल दुरुस्तीसाठी पूर्ण बंद झाला, त्या वेळी सांगलीकर आणि बाहेरील नागरिकांना समांतर पुलाची आवश्यकता लक्षात आली. नवीन पुलावरून येणारी मोठी वाहने ही गणपति पेठ मार्गे किंवा हरभट रस्त्यावरून जातील. त्यामुळे ‘मेनरोड’वर वाहतुकीचा ताण येणार नाही. व्यापार्यांच्या विविध प्रश्नांसाठी मी कायम व्यापार्यांच्या साहाय्यासाठी उभा राहिलो आहे. ‘व्यापार्यांना मी विश्वासात घेत नाही’, असे धादांत खोटे विधान काही व्यापारी नेते करत आहेत. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी सदैव माझ्या कार्यालयात लोकांच्या भेटींसाठी उपलब्ध असतो. व्यापारी अथवा नागरिक यांपैकी कुणाला काही शंका, सूचना असतील, तर केव्हाही मला ते भेटू शकतात. नागरिकांनी या सोनेरी टोळीच्या भूलथापांना बळी पडू नये.