जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्गचे आयोजन
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात अनेक औषधी वनस्पती नैसर्गिकरित्या विपुल प्रमाणात आढळतात. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात आयुर्वेद, तसेच औषधी वनस्पती यांचे महत्त्व सर्वांनाच पटले आहे. या पार्श्वभूमीवर ‘वनस्पतींची लागवड, संवर्धन आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन कसे
करावे ?’ याविषयी भारत सरकारच्या प्रशिक्षण कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत ‘जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग’च्या वतीने जिल्ह्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (आयुर्वेद आणि वनौषधी यांचे महत्त्व जाणून त्यांची लागवड अन् संवर्धन यांसाठी प्रयत्न करणार्या जनशिक्षण संस्थानचे अभिनंदन ! – संपादक)
गुळवेल, सर्पगंधा, ब्राह्मी, भारंगी, धायटी यांसारख्या वेली-वनस्पती, तसेच अर्जुन (सफेद ऐन), हिरडा, बेहडा, तेतु, तिरफळ, कडूकवठ यांसारखे वृक्ष या सर्वांनाच आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांची लागवड आपल्याकडे भातशेतीनंतर पडिक राहिलेल्या भूमीत, शेताच्या कडेने किंवा घराजवळील परसबागेत सहजरित्या करता येऊ शकते. यातून सिद्ध होणार्या कच्च्या मालाच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्नही आपल्याला मिळू शकते; परंतु औषधे बनवणार्या आस्थापनांना (कंपन्यांना) लागणारा कच्चा माल त्यांना आवश्यक असलेल्या गुणवत्तेनुसार सिद्ध करण्यासाठी औषधी वनस्पतींची लागवड चालू करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ? रोपे कशी निवडावी ? आदींचे व्यवस्थापन कसे करावे ? याविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रशिक्षण शुल्क २१० रुपये आहे, तर एस्.सी., एस्.टी. आणि बी.पी.एल्. लाभार्थी यांना १० रुपये शुल्क आहे. वयोमर्यादा १५ ते ४५ वर्षे असून प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्यांनी दूरभाष क्रमांक (०२३६२) २२३६६७ आणि भ्रमणभाष क्रमांक ७०५७१५४७५३, ९८१९७४१३८७ यांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.