महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहा १०० कोटी रुपयांची मागणी केली होती ! 

  • मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून गंभीर आरोप !

  • अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळला !

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका गृहमंत्र्यावर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने अशा प्रकारच्या खंडणीचा आरोप केला आहे. आतापर्यंत मंत्र्यांच्या योग्य-अयोग्य आदेशाचे पालन अधिकार्‍यांकडून केले जात होते; मात्र पहिल्यांदाच अधिकारीही गोत्यात येत असल्याने तेही आता त्यांना आदेश देणार्‍यांची नावे उघडे करत आहेत, असे समजायचे का ? परमबीर सिंह यांनी केलेले आरोप गंभीर असल्याने त्याची नोंद घेऊन मुख्यमंत्र्यांनी याविषयी जनतेला वस्तूस्थिती सांगणे आवश्यक आहे !

मुंबई – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहरातून प्रतिमहा १०० कोटी रुपये गोळा करून देण्याची मागणी केली, असा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. हे पत्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडेही पाठवण्यात आले आहे. ‘शहरात शेकडो हॉटेल, बार, पब आदी आहेत. त्यांच्याकडून पैसे गोळा केले जाऊ शकतात’, असे देशमुख यांनी म्हटल्याचाही या पत्रात दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे पत्र पाठवण्यात आले असले, तरी या पत्रावर परमबीर सिंह यांची स्वाक्षरी नाही. त्यामुळे आता पत्राविषयीही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

अनिल देशमुख यांनी ट्वीट करून हा आरोप फेटाळला आहे. ‘परमबीर सिंह आता गोत्यात आल्याने त्यांनी असा आरोप केला आहे’, असे देशमुख यांनी यात म्हटले आहे.

मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवलेली गाडी आढळल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. यानंतर परमबीर सिंह यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले.

२ दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘परमबीर सिंह यांना पोलीस आयुक्तपदावरून का हटवण्यात आले’, या प्रश्‍नावर उत्तर देतांना, ‘परमबीर सिंह यांचे स्थानांतर नेहमीचे नव्हते, तर एन्.आय.ए.च्या अन्वेषणात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. पोलीसदलातील काही अधिकार्‍यांकडून काही चुका झाल्या, ज्या क्षमा करण्यासारख्या नव्हत्या’, असे म्हटले होते.

पत्रात परमबीर सिंह यांनी म्हटले आहे की,

१. सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर गेल्या काही मासामध्ये फंड जमा करण्यासाठी अनेकदा बोलावले होते. फेब्रुवारीमध्ये या भेटी झाल्या. अशा भेटींच्या वेळी अनेकदा १-२ कर्मचारी आणि देशमुख यांचे स्वीय साहाय्यक पालांडे हेही तेथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना प्रत्येक मासाला १०० कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य दिले होते. ते लक्ष्य पूर्ण करण्यासाठी जवळपास १ सहस्र ७५० बार, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर, पब्स आदींचा समावेश होता. ज्यातून प्रत्येकाकडून २-३ लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते, म्हणजेच मासाला ४० ते ५० कोटी रुपये जमा होतील. उर्वरित पैसे हे इतर गोष्टीतून मिळवता येतील, असे म्हणता येईल.

२. सचिन वाझे यांनी त्याच दिवशी माझ्या कार्यालयात येऊन या सगळ्या प्रकाराविषयी मला माहिती दिली. ते ऐकून मला धक्काच बसला. या प्रकारावर काय करावे, यावर मी विचार करायला लागलो.

३. २२ फेब्रुवारीला जेव्हा मुंबईतील हॉटेलमध्ये दमणचे खासदार मोहन डेलकर यांच्या मृतदेहासह चिठ्ठी मिळाली होती. यामध्ये काही वरिष्ठ अधिकार्‍यांना कंटाळून आत्महत्या केल्याचे डेलकर यांनी म्हटले आहे; परंतु अनिल देशमुख सातत्याने आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांवर दबाव टाकत होते.

अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळले !

परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अनिल देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. अनिल देशमुख यांनी म्हटले की, मुकेश अंबानी प्रकरणी, तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असतांना आणि त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यापर्यंत पोचणार असल्याची शक्यता अन्वेषणातून होत असतांना त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी, तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.