रामनाथी आश्रमात झालेल्या ‘प्रथमोपचार शिबिरा’त साधकांना आलेल्या अनुभूती

वर्ष २०१७ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधकांसाठी ‘प्रथमोपचार शिबिर’ झाले. त्या शिबिराच्या कालावधीत साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

१. सौ. मुक्ता मिलिंद सावंत, चिंचवड, पुणे

१ अ. आश्रमाच्या प्रवेशद्वारावर डोके टेकल्यावर पुष्कळ शांत वाटणे : मी सकाळी रामनाथी आश्रमात आले. मी आश्रमाच्या प्रवेशद्वारावर डोके टेकवल्यावर मला पुष्कळ शांत वाटले. ‘परात्पर गुरुदेवांंना भेटायचे, त्यांना पहायचे’, हे माझ्या मनातील विचार पूर्णपणे निघून गेले. तेव्हा मी परात्पर गुरुदेवांचे सूक्ष्म अस्तित्व अनुभवत होते.

१ आ. सकाळी शिबिराच्या पहिल्या सत्रात गुरुचरणांचे स्मरण करतांना मला सुदर्शनचक्र फिरतांना दिसले.

१ इ. आश्रमात सर्वत्र लहान गोळे लुकलुकतांना दिसणे : श्री. महावीर श्रीश्रीमाळ मार्गदर्शन करत होते. तेव्हा मला त्यांच्या अनाहत चक्राजवळ बोराच्या आकाराचा गोळा चमकतांना दिसला. शिबिरातील तिन्ही दिवशी मला सभागृहात आणि आश्रमात सर्वत्र लहान गोळे लुकलुकतांना दिसत होते.

१ ई. गुरुदेवांचे सूक्ष्मातून दर्शन होतांना त्यांनी फिकट पिवळ्या रंगाचा सदरा परिधान केलेला दिसणे, त्यांचे दर्शन झाल्यावरही तसाच सदरा परिधान केलेला दिसणे : मी सकाळी सभागृहात आल्यावर गुरुदेवांच्या स्मरणाने माझे मन कृतज्ञतेने भरून आले. तेव्हा मला व्यासपिठावरील आसंदीवर गुरुदेवांचे सूक्ष्मातून दर्शन झाले. त्यांनी ‘फिकट पिवळ्या रंगाचा सदरा परिधान केला आहे’, असे मला दिसले आणि त्याच दिवशी मला गुरुदेवांचे दर्शन झाले. तेव्हा त्यांनी फिकट पिवळ्या रंगाचा सदरा परिधान केलेला होता.

२. सौ. पल्लवी पेडणेकर, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. 

२ अ. भावसत्संग ऐकतांना चक्कर येऊनही ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप भावपूर्ण होणे : रामनाथी आश्रमात भावसत्संग ऐकत असतांना मला एकाएकी चक्कर आली. त्या वेळी साधकांनी मला सभागृहातून बाहेर आणून झोपवले. तेव्हा मी अर्धवट ग्लानीत होते. माझ्या पायांत शक्ती नव्हती, तरी मनातून माझा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप भावपूर्ण होत होता आणि मनाला पुष्कळ शांत वाटून आनंद मिळत होता. त्या वेळी आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत आणि सहसाधक यांनी तत्परता दाखवून माझ्यावर प्रथमोपचार केले. मी १५ मिनिटांनी पूर्ववत् झाले आणि पुन्हा भावसत्संगाला जाऊन बसले.

२ आ. संतांच्या सत्संगात मनातील प्रश्‍नाचे उत्तर मिळणे : शिबिराचे दिवस जसे जवळ येत होते, तसा ‘संतांचा सत्संग लाभणार’, या विचाराने मला पुष्कळ आनंद होत होता; मात्र शिबिर चालू झाल्यावर माझा हा विचार आपोआप न्यून झाला. तेव्हा मी संतांना सूक्ष्मातून सांगितले, ‘शिबिराला येण्यापूर्वी ‘तुमचा सत्संग लाभणार’, याचा मला आनंद होत होता. आता मला आनंद होत नाही, मला क्षमा करा. तुम्हाला अपेक्षित असेच होऊ दे. मला काही समजत नाही.’ मी सत्संगासाठी गेले. त्या वेळी एका साधिकेने तिच्या मनाची स्थिती संतांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘इथे सर्व निर्गुण आहे. देव व्यापक आहे.’’ त्या वेळी मलाही माझ्या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले.

२ इ. सत्संगात भावजागृती होऊन मन शांत होणे : मार्गदर्शन करण्यास संत यायच्या आधी ‘देवाने माझ्यासाठी आतापर्यंत काय केले ?’, ते सर्व आठवून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊन माझी भावजागृती होत होती. आईच्या आठवणीने बाळ रडते, तशी स्थिती त्या वेळी माझी झाली होती. त्या वेळी माझे मन शांत झालेे.

३. सौ. प्रणिता प्रदीप तवटे, सिंधुदुर्ग

३ अ. सत्संगाच्या वेळी पांढरा प्रकाश पसरलेला दिसून स्वर्गात असल्यासारखे वाटणे : मी सत्संगासाठी बसले असतांना मला खोलीत तिरूपती बालाजी आणि एक कमळ दिसले. ‘संत कधी येऊन बसले ?’, ते मला कळलेच नाही. तेव्हा पांढरा प्रकाश पसरला होता आणि गारवा जाणवत होता. मला स्वर्गात असल्यासारखे वाटत होते. ‘मी पुष्कळ दिवसांपासून स्वर्गलोकात रहात आहे’, असे मला वाटले. माझा सतत कृतज्ञताभाव दाटून येत होता.

४. डॉ. ऋतुजा काटोटे, सोलापूर यांना झालेले त्रास

४ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मार्गदर्शन करतांना ‘ऐकायला थांबू नये’, असे वाटणे : ‘श्रीसत्शक्ति बिंदा सिंगबाळ यांचे मार्गदर्शन आहे’, असे समजल्यावर मला संमिश्र अनुभूती आली. त्यांचे मार्गदर्शन म्हटल्यावर आनंद झाला आणि मला ताणही जाणवत होता, तसेच छातीवर दाब जाणवत होता. गेल्या वर्षीही त्यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी मला असाच त्रास जाणवला होता. मला पुष्कळ गरम वाटत होते आणि विषयाचे आकलन होत नव्हते. माझ्या हातातून पेन निसटून हात थरथरून वेडेवाकडे लिखाण होत होते. मला डोके दुखणे, गरम वाफा येणे, अंग थरथरणे, ‘तेथे थांबू नये’, असे वाटणे, पेन हातात नीट धरता न येणे, गळून गेल्यासारखे वाटणे, अनावर झोप येणे, असे त्रास जाणवले.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  •  आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक