यांगून (म्यानमार) – म्यानमारमध्ये सैन्याने बंडखोरी करून सत्ता कह्यात घेतल्यानंतर येथे गेल्या दीड मासापासून मोठ्या प्रमाणात जनतेकडून विरोध केला जात आहे. १४ मार्च या दिवशी देशात संतप्त नागरिकांनी काही चिनी आस्थापनांना आग लावल्यानंतर म्यानमारच्या सैन्याने केलेल्या गोळीबारात ५१ नागरिक ठार झाले. आतापर्यंत या आंदोलनामध्ये १२५ हून अधिक आंदोलक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. चिनी दूतावासाने या घटनेची गंभीर नोंद घेत त्यांच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर संयुक्त राष्ट्रांनी ‘म्यानमारच्या सैन्याने लोकांनी निवडून दिलेल्यांच्या हाती पुन्हा सत्ता सोपवावी’, असे आवाहन केले आहे.