१. व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत नसल्यानेे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात कठोर शब्दांत जाणीव करून देणे, त्यानंतर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या बोलण्याने, न बोलण्याने, त्यांच्या आवाजाने किंवा आठवणीनेही त्रास जाणवणे आणि हा त्रास सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना लघुसंदेश करून कळवणे
‘मला बर्याच दिवसांपासून पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत होता. माझ्याकडून व्यष्टी साधनेचे काहीच प्रयत्न होत नव्हते. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला व्यष्टी साधनेच्या आढाव्यात कठोर शब्दांत त्याची जाणीव करून दिली. त्यानंतर हळूहळू काही दिवसांनंतर ते सहज जरी मला काही बोलले, तरी मला त्रास होऊ लागला. कधी कधी ते काहीच बोलले नाहीत, तरी त्याचाही मला त्रास होऊ लागला. त्यानंतर सद्गुरु राजेंद्रदादा दिसले किंवा त्यांचा आवाज ऐकला, अगदी झोपेत जरी त्यांची आठवण झाली, तरी त्याचाही मला त्रास होऊ लागला. ‘मला काय होत आहे ?’, हे काहीच कळत नव्हते; कारण एके काळी सद्गुरु राजेंद्रदादांनी सांगितलेल्या साधनेला पूरक कृतींमुळे मला भरभरून आनंद मिळत होता. मग ‘मला आताच असा त्रास का होत आहे ?’, हे मला कळत नव्हते. मला होणारेे हे सर्व त्रास मी सद्गुरु राजेंद्रदादांना लघुसंदेशाद्वारे कळवले.
२. आध्यात्मिक त्रासात पुष्कळ वाढ होणे, सूक्ष्मातून दिसलेल्या दृश्यात ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे समोर बसले आहेत’, असे दिसणे, त्या वेळी शरिरातून काहीतरी निघून गेल्याचे जाणवून पुष्कळ थकवा येणे
३०.५.२०२० या दिवशी दुपारी मी विश्रांती घेत असतांना मला होणार्या आध्यात्मिक त्रासात पुष्कळ वाढ झाली. ‘मी सद्गुरु राजेंद्रदादांना त्यांच्या नावाने मोठ्याने आवाज देत आहे आणि सद्गुरु राजेंद्रदादा माझ्यासमोर आसंदीवर येऊन बसले आहेत’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले.त्यानंतर ‘माझ्या शरिरातून काहीतरी निघून गेलेे’, असे मला जाणवले आणि मला जाग आली. तेव्हा मला एवढा थकवा आला की, मला बोलण्याचीही शक्ती राहिली नाही. रात्री ८ वाजल्यानंतर मी पूर्ण बरी झाले.
३. कृतज्ञतापुष्प
या प्रसंगानंतर मला पूर्वीप्रमाणे सद्गुरु राजेंद्रदादांच्या आठवणीने आनंद मिळू लागला. ‘त्यांनी माझ्यावर फार मोठी कृपा केली आहे’, या जाणिवेने माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. मी रात्री नामजपासाठी बसल्यावर देवाच्या कृपेने मला पुढील काव्यपंक्ती सुचल्या.
कितीही भरकटलो आम्ही, तरी पुन्हा खेचून घेता साधनेच्या क्षेत्रात ।
तुमच्या प्रेमामुळेच आनंदी आहोत आम्ही ।
गुरुमाऊलीसारखेच प्रीतीमय आहात तुम्ही (टीप) ॥ १ ॥
आमच्या मनातील सर्व विचार जाणता तुम्ही ।
कितीही अयोग्य विचार आले, तरी वदवुनी घेता तुम्ही ॥ २ ॥
वेगवेगळ्या युक्त्या योजून आम्हाला त्रासातून बाहेर काढता ।
तुम्हाला सांगता क्षणी सर्व विचार नष्ट होऊन जातात ॥ ३ ॥
गुरुमाऊलीने दिली आहे आमच्या जीवनाची दोरी तुमच्या हातात ।
कितीही भरकटलो आम्ही, तरी पुन्हा खेचून घेता साधनेच्या क्षेत्रात’ ॥ ४ ॥
टीप : सद्गुरु राजेंद्र शिंदे
– सौ. अंजली झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |