महागाईमुळे व्हेनेझुएलाने छापली १० लाख रुपयांची नोट !

भारतात याचे मूल्य जवळपास ३६ रुपये !

व्हेनेझुएलामध्ये राजकीय अराजक माजल्यामुळे तेथील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. त्यासह रशिया आणि अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी तेथील अंतर्गत सूत्रांमध्ये हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे देश संकटाच्या खाईत लोटला असून महागाईने परिसीमा गाठली आहे. अराजक माजल्यावर आर्थिक चलनाचे कसे अवमूल्यन होते, याचे हे उदाहरण होय !

व्हेनेझुएला या देशाने महागाईतून बाहेर पडण्यासाठी छापली १० लाख रुपयांची नोट !

नवी देहली – महागाईचा उच्चांक गाठणार्‍या दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशाने महागाईतून बाहेर पडण्यासाठी १० लाख रुपयांची नोट छापली आहे. जगातील कुठल्याही देशाने यापूर्वी एवढ्या मोठ्या मूल्याची नोट छापलेली नाही; मात्र या १० लाखांचे भारतीय चलनानुसार मूल्य जवळपास ३६ रुपये आहे. या देशात महागाईमुळे आता लोक साहित्य खरेदी करण्यासाठी पोते भरून पैसे घेऊन जातात आणि एखाद्या पॉलिथीनच्या पिशवीत साहित्य घेऊन येतात.

व्हेनेझुएलाच्या केंद्रीय बँकेने सांगितले की, देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती पाहिल्यावर मोठ्या किमतीच्या नोटा छापाव्या लागल्या. पुढील आठवड्यात २ लाख बोलिवर (व्हेनेझुएलाचे चलन) आणि ५ लाख बोलिवर अशा नोटा जारी करण्यात येणार आहेत. वर्तमानात व्हेनेझुएलामध्ये १० सहस्र, २० सहस्र आणि ५० सहस्र बोलिवरच्या नोटा चलनात आणल्या आहेत. भारतातील १ रुपयाची व्हेनेझुएलातील किंमत २५ सहस्र ५८४ बोलिवर आहे.