मोर्ले येथे हत्तीच्या आक्रमणात युवक गंभीर घायाळ

शासनाकडून ५० सहस्र रुपये तातडीचे साहाय्य

जनतेला त्रासदायक ठरणार्‍या हत्तींचा उपद्रव थांबवता न येणे, हे प्रशासनाचे अपयशच होय !

दोडामार्ग – तालुक्यात हत्तींचा उपद्रव पुन्हा चालू झाला असून काही ठिकाणी शेती, बागायती यांची हानी हत्तींकडून केली जात आहे. आतापर्यंत शेती, बागायती यांची हानी करणारे हत्ती आता माणसांवरही आक्रमण करू लागले आहेत. ६ मार्चला मोर्ले येथील शेतकरी विश्‍वनाथ सुतार काजूच्या बागेत गेले होते. तेव्हा अचानक आलेल्या हत्तीने सुतार यांच्यावर आक्रमण करत त्यांना उचलून आपटले. यामध्ये सुतार गंभीर घायाळ झाले होते. त्यांना स्थानिकांनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी बांबोळी, गोवा येथील रुग्णालयात भरती केले आहे. ७ मार्चला जिल्हा उपवनसंरक्षक एस्.डी. नारनवर यांनी सुतार यांची गोवा येथील रुग्णालयात भेट घेतली. या वेळी नारनवर यांनी सुतार यांना शासकीय निर्देशानुसार तातडीचे साहाय्य म्हणून ५० सहस्र रुपयांचा धनादेश दिला, तसेच उपचारांसाठी अधिक साहाय्य लागल्यास वन विभागाच्या वतीने केले जाईल, असे आश्‍वासन दिले.