मृत्यू संशयास्पद असल्याने प्रकरणाची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेद्वारे चौकशी करावी ! – देवेंद्र फडणवीस

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळला !

  • विसंगती देणारी माहिती दिल्याने विधानसभेत खडाजंगी

  • तपास ए.टी.एस्.कडे

मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – काही दिवसांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज्चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या येथील अँटिलिया निवासाबाहेर स्फोटके असलेले काळ्या रंगाचे स्कॉर्पियो वाहन सापडले होते. या चोरण्यात आलेल्या वाहनाचे आणि ठाणे येथील ‘क्लासिक मोटर्स’चे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह पोलिसांना मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत संशयास्पद स्थितीत ५ मार्च या दिवशी आढळला आहे. तत्पूर्वीच ‘मनसुख हिरेन यांच्या जिवाला धोका आहे. हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याने या संपूर्ण प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) च्या वतीने करण्यात यावे’, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ५ मार्च या दिवशी केली. आणि या विषयावरून सत्ताधारी सदस्य आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. मनसुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी ५ मार्च या दिवशी दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात केली होती. अखेरीस या प्रकरणारचा तपास आतंकवादविरोधी पथकाकडे सोपवल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

गृहमंत्री अनिल देशमुख याविषयी विधानसभेत म्हणाले की, मनसुख हिरेन यांनी ते वाहन खरेदी केले नव्हते, तर त्यांच्या कह्यात होते. ते वाहन सॅमन्युटर यांच्या मालकीचे आहे. सॅमन्युटर यांनी वाहनाचे ‘इंटेरियर’चे दीड लाख रुपयांचे देयक न दिल्याने मनसुख यांनी हे वाहन स्वतःकडे ठेवले होते. असे सांगताच त्याला विरोधकांनी आक्षेप घेतला.

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या वाहनात स्फोटके होती, त्या वाहनाचे मालक मनसुख यांनी आपल्या पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे की, हे वाहन माझ्या मालकीचे आहे. माझे वाहन बंद पडले होते; पण ‘क्रॉफर्ड मार्केट’ला कामासाठी गेलो, त्या वेळी त्या वाहनाची चोरी झाली होती. ‘क्रॉफर्ड मार्केट’चे काय ‘कनेक्शन’ आहे, त्याची पोलिसांनी चौकशी करायला हवी. मनसुख यांना सुरक्षा दिली पाहिजे, ही मागणी सभागृहात काही वेळापूर्वी केली होती आणि आता त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली. गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळते. खरी माहिती द्यायला अडचण काय आहे ? मनसुख यांचे हात बांधलेले होेते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केलेली नाही. या प्रकरणामध्ये गौडबंगाल आहे. हे वाहन दिसल्यावर स्थानिक किंवा गुन्हे शाखेचे नव्हे, तर प्रथम पोलीस अधिकारी सचिन वाझे तेथे कसे पोचले ? वाझे हे ठाण्याचे असून त्यांचा अनेक वेळा हिरेन यांच्याशी संपर्क झाला आहे. गाडीतील धमकीचे पत्र प्रथम वाझे यांना मिळते. हा घटनाक्रम शंका निर्माण करणारा आहे. त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण एन्.आय.ए. ने करावा. तसे मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती करतो.

या वेळी गृहमंत्री देशमुख यांनी ‘पोलीस अधिकारी सचिन वाझे हे रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना घरी जाऊन अटक केल्यामुळे त्यांच्यावर तुम्ही राग काढत आहात का ?’ असे म्हणताच याला विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. यावरून सत्ताधारी सदस्य आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली.

भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले की, मनसुख हे जिवंत असतांना त्यांनी हे वाहन खरेदी केले होते, असे ते सांगत असतांना पोलीस विसंगती देणारी माहिती कशी देतात ? त्यांचा आकस्मिक मृत्यू होतो. पोलिसांनी आरोपींना मोकळे सोडले आणि मनसुख यांना पोलीस संरक्षण देऊ शकले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात काळेबेरे असल्याने या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हायला हवी. आम्ही पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अजिबात घाबरत नाही. त्याची भीती दाखवू नका.