दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपिलेश्‍वर मंदिरासह बेळगाव जिल्ह्यातील १६ देवस्थानांवर प्रशासकांची नियुक्ती 

  • मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणून ते भक्तांच्या स्वाधीन होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • भाजपच्या राज्यात मंदिरांचे सरकारीकरण अपेक्षित नसून त्याने सर्व मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे अपेक्षित आहे !
  • सरकार एकीकडे स्वतःच्या मालकीच्या आस्थापनांचे खासगीकरण करत असतांना मंदिरांचे सरकारीकरण करत आहे, हे लक्षात घ्या !
  • भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष असतांना मशीद आणि चर्च यांचे सरकारीकरण न करता केवळ हिंदु मंदिरांचे सरकारीकरण केले जात आहे, हे लक्षात घ्या !

बेळगाव – बेळगाव शहरासह जिल्ह्यातील १६ देवस्थानांवर प्रशासकांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा धर्मादाय विभागाने दिले आहेत. या संदर्भात १८ फेब्रुवारी या दिवशी आदेश जारी करण्यात आला. यात प्रामुख्याने शहरातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे श्री कपिलेश्‍वर मंदिर, शहापूर येथील श्री अंबाबाई मंदिर यांचा समावेश आहे. प्रशासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये तीव्र अप्रसन्नता आहे.

जिल्हा धर्मादाय विभागाची ४ फेब्रुवारी या दिवशी बैठक झाली. त्यात विविध देवस्थानांवर प्रशासकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासक कधीपासून कामकाज पहाणार, हे अद्याप स्पष्ट नसून चालू मासाच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात प्रशासक मंदिरे कह्यात घेतील, असे संकेत मिळत आहेत. प्रशासक नियुक्ती आदेशाच्या विरोधात देवस्थान समितीच्या सदस्यांकडून विरोध होत आहे. या प्रकरणी न्यायालयीन लढा देणे, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणे अशा विविध मार्गांचा अवलंब केला जाणार आहे.

प्रशासक नेमलेली काही प्रमुख मंदिरे आणि देवस्थाने

१. कपिलेश्‍वर देवस्थान, बेळगाव

२. श्री बनशंकरी देवस्थान, वडगाव

३. श्री अंबाबाई देवस्थान, शहापूर

४. श्री जिव्हेश्‍वर देवस्थान, वडगाव

५. श्री जालगाव मारुति देवस्थान, चव्हाट गल्ली

६. श्री गजानन भक्त परिवार मंडळ, शांतीनगर, टिळकवाडी

७. श्री भैरवदेव कलमेश्‍वर मंदिर, होनगर

८. श्री बसवेश्‍वर, कलमेश्‍वर आणि ब्रह्मदेव देवस्थान, कुडची

९. श्री लक्कब्बादेव देवस्थान, बेक्केरी

१०. श्री पंचलिंगेश्‍वर देवस्थान, मुन्नोळी, ता. सौंदत्ती

११. श्री बसवेश्‍वर देवस्थान, खिळेगाव, ता. अथणी

१२. श्री हनुमान देवस्थान, सौंदती

केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण का ? – किरण गावडे, जिल्हाध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगाव

मंदिर सरकारीकरणास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा तीव्र विरोध

बेळगाव, १ मार्च – जिल्ह्यातील १६ देवस्थानांवर प्रशासक नियुक्त करण्यास शासनाच्या भूमिकेस श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा तीव्र विरोध आहे. हिंदु मंदिरांचे सरकारीकरण मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. मुसलमान, ख्रिस्ती, जैन, शीख, पारसी आदींना वगळून केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण का ? अन्य पंथियांच्या एकाही प्रार्थनास्थळाचे सरकारीकरण का नाही ? सरकार केवळ हिंदूंच्या मंदिरातील पैसा अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी व्यय करत आहे. प्रत्येक शासकीय व्यवस्थेत अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आणि हिंदूंचे शोषण केले जात आहे. याला आमचा तीव्र विरोध आहे, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री. किरण गावडे यांनी केले आहे.