पाकडून १७ भारतीय मासेमार्‍यांना अटक : ३ नौकाही जप्त

कराची (पाकिस्तान) – पाकने त्याच्या सागरी सीमेमध्ये घुसखोरी केल्याचे सांगत भारताच्या १७ मासेमार्‍यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्या ३ नौकाही जप्त केल्या आहेत. पाकने म्हटले की, त्यांना पाकच्या सीमेतून दूर जावे, अशी चेतावणीही देण्यात आली होती; मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

पाकने जवळपास १ वर्षानंतर भारतीय मासेमारांना अशा गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. भारत आणि पाक एकमेकांच्या सागरी सीमेमध्ये घुसखोरी केल्यावरून एकमेकांच्या मासेमार्‍यांना अटक करत असतात. दोघांनाही सागरी सीमेविषयी स्पष्ट माहिती नसल्याने ही स्थिती येत असते. तसेच सीमा ओळखण्याची योग्य यंत्रणा असलेल्या नौकाही नसल्याने त्यांना अशा स्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा मासेमार्‍यांना अटक केल्यावर काही मास किंवा काही वर्षे कारागृहात रहावे लागते.