१. शिवपिंडीचे पूजन झाल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांची खोली कर्पूर वर्णमय झाली असून खोलीत शीतलता जाणवणे
‘२५.१०.२०१९ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या खोलीत शिवपिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रात्री तेथील मांडणी आवरायला गेल्यावर ‘त्यांच्या खोलीत संपूर्ण वातावरण कर्पूर वर्णमय झाले आहे’, असे वाटले. त्या वेळी त्या लहान खोलीत बरीच गर्दी होती, तरीही संपूर्ण खोलीत शीतलता जाणवत होती, तसेच खोलीत असतांना श्वास घेण्याची क्रियाही अतिशय संथ गतीने होत होती.
२. महासुदर्शन यागाच्या वेळी पहिल्या आणि दुसर्या दिवशी त्रास होणे, तसेच यागाच्या तिसर्या दिवशी साक्षात् श्री महाविष्णूकडून चैतन्याचा ओघ येऊन तोच सर्व कार्य करत असून ‘आम्ही केवळ अनुभवत आहोत’, असे जाणवले. याविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी सांगितले, ‘‘निर्गुण तत्त्व वाढल्याने सर्व आपोआप होत आहे.’’
३. महासुदर्शन यागाच्या दुसर्या आणि तिसर्या दिवशी जाणवलेले पालट
२६.१०.२०१९ या दिवशी महासुदर्शन याग चालू होऊन तो तिसरा दिवस होता. देवाच्या कृपेने त्यातील दुसर्या आणि तिसर्या दिवशी यागाला बसण्याची संधी मिळाली. तेव्हा दोन दिवसांमध्ये पुढील पालट जाणवला.
अ. दुसर्या दिवशी श्लोक आणि मंत्र म्हणतांना आवाज सहज बाहेर येत नव्हता, तसेच करत असलेल्या कृतींमध्ये सहजता येत नव्हती. दिवसभर डोके जड झाले होते. याउलट यागाच्या तिसर्या दिवशी ‘मंत्र आपोआप म्हटले जात आहेत’, असे वाटत होते.
आ. यागाच्या दिवशी दुपारनंतरच्या सत्रात संपूर्ण शरीर हलके झाले आहे आणि हवन अन् मंत्र आम्ही म्हणत नसून ‘साक्षात् श्री महाविष्णुकडून चैतन्याचा ओघ येत आहे आणि त्याच्यामुळेच सर्व होत आहे. आम्ही केवळ अनुभवत आहोत’, असे वाटले.
याविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी सांगितले, ‘‘दुसर्या दिवशी सूक्ष्म युद्ध चालू होते. त्यामुळे जडत्व जाणवले; पण तिसर्या दिवशी ‘यज्ञातील निर्गुण तत्त्व वाढल्याने आपल्याला काही करावे लागत नसून सर्व आपोआप होत आहे’, असे जाणवत आहे.’’
इ. यागाच्या दुपारनंतरच्या सत्रात हवनापूर्वी ‘शांताकारम्…’ हे श्री महाविष्णूचे ध्यान म्हणतांना ‘केवळ आम्हीच नव्हे, तर अथांग अशा क्षीरसागरात ऋषिगण आणि सर्व साधक अतिशय धीर गंभीर आवाजात हे ध्यान म्हणत आहेत’, असे वाटले.
ई. यागाच्या पूर्णाहुतीनंतर कुंडामध्ये इंधन घालत असतांना अग्नीची दाहकता जाणवत नव्हती. अग्नीविषयी प्रेम वाटत होते, तसेच ‘त्या अग्नीचा आपल्याला स्पर्श व्हावा’, असे विचार येत होते. पूर्णाहुतीनंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी सांगितले, ‘‘पूर्णाहुतीच्या ज्वाळा, म्हणजे साक्षात् विष्णुच आहे.’’ त्यानंतर वरील विचार येण्यामागचे कारण कळले.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई लक्ष्मीपूजन करतांना ‘लक्ष्मीदेवीच लक्ष्मीपूजन करत आहे’, असे जाणवणे
२७.१०.२०१९ या दिवशी दीपावलीनिमित्त श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. तेव्हा असे वाटले, ‘शास्त्रामध्ये देवासारखे होऊन देवाचे पूजन करावे’, असे म्हटले आहे. त्यासाठी न्यास आदीद्वारे शरीर पवित्र करण्याचा विधी दिला आहे; परंतु श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई लक्ष्मीचे पूजन करत असतांना ‘लक्ष्मीदेवीच लक्ष्मीपूजन करत आहे’, असे सतत वाटत होते.
५. निर्विचार स्थिती अनुभवता येणे
त्यानंतर हिशोबाच्या वहीचे पूजन करत असतांना त्यातील देवीचे ध्यान म्हणतांना केवळ आरंभ आणि शेवट लक्षात आला. उर्वरित संपूर्ण ध्यान म्हणतांना निर्विचार स्थिती अनुभवता आली.
६. ‘स्वतःच्या हातून झालेल्या चुकांचे परिमार्जन लवकरात लवकर व्हावे’, असा विचार तीव्रतेने येणे अन् त्याच वेळी आश्रमात संतांनी आतापर्यंत जे पाप झाले, त्याचे क्षालन करण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगणे
गेले काही दिवस ‘माझ्या हातून ज्या चुका होत आहेत, त्यांचे परिमार्जन लवकरात लवकर व्हायला हवे’, अशा आशयाचे विचार मनात येत होते. दिवसातील काही वेळा एखादी कृती करतांना माझ्याकडून ‘माझ्या मनाचा संघर्ष होईल’, अशा मनाविरुद्ध कृती करण्याचा प्रयत्न होत होता. अशी मनाची प्रक्रिया चालू असतांनाच २ आणि ३ नोव्हेंबर या दिवशी मनात ‘आश्रमात जाऊया’, असा विचार तीव्रतेने येऊ लागला. ते विचार एवढे तीव्र होते की, रात्री झोपही याच विचारात लागत होती आणि सकाळी जाग यायची, तेव्हाही हाच विचार मनात असायचा. शेवटी मी आश्रमात यायचे ठरवून ५ तारखेला आश्रमात आलो.
आश्रमामध्ये संत ज्या ठिकाणी नामजपादी उपाय करत होते, त्या ठिकाणी गेल्यावर आम्हाला ‘आपल्याकडून आतापर्यंत जे पाप झाले, त्याचे क्षालन होण्यासाठी प्रार्थना करा’, असे त्यांनी सांगितले. हे सर्व होईपर्यंत आश्रमात संत आले असून ते साधकांच्या पापक्षालनासाठी उपाय करणार आहेत, हे मला माहिती नव्हते. त्यानंतर ‘गेले काही दिवस मनाची अशी स्थिती का होती ?’, हे लक्षात आले.
७. कालभैरव यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती
७ अ. यज्ञाच्या आरंभी ‘यज्ञात अडथळे येऊ नये, अशी स्तोत्रे म्हणूया’, असा विचार येणे आणि प्रत्यक्ष यज्ञाच्या वेळी अडथळे येणे अन् ‘ही देवाने दिलेली पूर्वसूचना आहे’, असे जाणवणे : यज्ञाचा प्रारंभ होईपर्यंत काही स्तोत्र म्हणायची होती. त्या वेळी ‘कोणती स्तोत्र म्हणावीत ?’, असा विचार आल्यानंतर ‘यज्ञामध्ये अडथळे येऊ नयेत, अशी स्तोत्रे म्हणूया’, असा विचार आला. सामान्यपणे इतर वेळी ज्या देवतेचा यज्ञ आहे, त्या देवतेची स्तोत्र म्हणण्याचे विचार असतात; परंतु ‘प्रथमच निर्विघ्नता येण्यासाठी ज्या देवतांची उपासना आवश्यक आहे. त्यांची स्तोत्रे म्हणूया’, असा विचार आला. यज्ञाला प्रारंभ झाल्यानंतर यज्ञामध्ये अनेक अडथळे येत होते. त्या वेळी यामागचे कारण लक्षात आले आणि ‘देवाने असा विचार देऊन पूर्वसूचनाच दिली होती’, असे वाटले.
७ आ. ‘कालभैरवाचे श्वान मंत्र म्हणत आहे’, असे जाणवणे : यज्ञ चालू असतांना जपासाठी बसल्यावर डोळे बंद करून मंत्रोच्चार ऐकत असतांना ‘हे मंत्र कालभैरवाचे श्वान म्हणत आहे’, असे ऐकू येत होते आणि कुत्र्यांचा आवाजही ऐकू येत होता; परंतु डोळे उघडल्यानंतर पुन्हा पुरोहितांच्या आवाजात मंत्र ऐकू येत होते.
– एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.६.२०१९)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |